मुंबई : आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्याच दिवशी शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यापुढे शिक्षकांवरील शाळाबाह्य कामांचं ओझं कमी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक शाळेव्यतिरिक्त शासनाची जी कामं करतात त्यावर अंकुश लागणार आहे. तसंच शिक्षकांचे पगार वेळेवर होणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक पुरस्कार सोहळा बंद करण्यात आला होता तो सोहळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारनं घेतला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री स्वत: उपस्थित राहणार आहेत.


राज्यातील शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.


शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देताना केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


भिवंडी, सिंधुदूर्ग, पुणे, सोलापूर, नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशीम, उस्मानाबाद, वर्धा, येथील शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.