`मराठी माध्यमांत शिकले म्हणून १०२ शिक्षकांची नेमणूक रखडली`
धक्कादायक बातमी. १०२ शिक्षकांची नेमणूक रखडली आहे.
मुंबई : धक्कादायक बातमी. दहावीपर्यंत मराठी माध्यमांत शिकले म्हणून महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या १०२ उमेदवारांची नेमणूक डावलण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अजब न्याय समोर आला आहे. महापालिका शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमांतून शिक्षक म्हणून निवडल्या गेलेल्या १०२ शिक्षकांची नेमणूक रखडली आहे.
पवित्र पोर्टलद्वारे २०१७ च्या डिसेंबर महिन्यात शिक्षकांच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या गेल्या. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची महापालिकेच्या इंग्रजी शाळांसाठीही निवड करण्यात आली. मात्र, परीक्षेत पात्र ठरलेल्या १०२ उमेदवारांना त्यांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मराठीत असल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार नाही, असे अजब कारण देण्यात आले.
विशेष म्हणजे, या डावलण्यात आलेल्या १०२ शिक्षकांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झाले आहे.