दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अकरावी प्रवेशाबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं म्हटल्यानंतर आता याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यावेळी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनंही महत्त्वाची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावी प्रवेशाचा मुद्दा गेल्या बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर पडत होता. ज्यानतंर पालक आणि विद्यार्थी वर्गातून मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर आळवला गेला. ज्यानंतर आता याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. किंबहुना आपण स्वत: याबाबत महाधिवक्त्यांशी चर्चा केल्याचं सांगत आता मुख्यमंत्र्यांशीही चर्चा सुरु असल्याचं त्या म्हणाल्या. 


मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. परिणामी याबाबत आम्ही विधी व न्याय विभागाचे मत जाणून घेत आहोत असं म्हणत कायदेशीर बाबी तपासूनच अकरावी प्रवेशाबाबत निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. 


हे प्रकरण न्यायालयीन असल्याने आम्ही सर्व कायदेशीर बाजू तपासून घेत असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 


शिक्षकाना दिवाळीत सुट्टी मिळणार असल्यामुळं आता ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही दिवाळीच्या काळात यातून सुटका होणार आहे. शिक्षकांसाठी ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला असून कारण विद्यार्थींना ऑनलाईन योग्य पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे असं त्या म्हणाल्या. 


 


दिवाळीच्या सुट्टीबाबत आपण शिक्षण महासंचालकांशी चर्चा केली असल्याचं म्हणत शिक्षकांना मिळणार्‍या पारंपरिक सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत किंबहुना अशा सूचना मी दिल्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.