`सनातन` ला राजाश्रय, या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? – नवाब मलिक
सनातनला गोवा व महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? सरकारने आता हा विषय गांभार्याने घ्यावा व या संस्थेवर तात्काळ बंदी आणावी. - राष्ट्रवादी
मुंबई : नालासोपारा येथून सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत याला महाराष्ट्र एटीएस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या घरी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. घातपात करण्याच्या कारवाईत सनातन संस्थेचा हात आहे. मात्र, त्यांना राज्य सरकारचा राजाश्रय मिळत आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
दरम्यान, सनातन संस्थेन वैभव हा आमचा नाही. मात्र, त्याल मदत हवी असेल तर ती आम्ही करु असे सांगत त्याला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊतला अटक केली. त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरुन सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे हे स्पष्ट होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
आमच्या सरकारने या सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या सनातन संस्थेला गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय मिळत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. या सनातन संस्थेला अजून किती लोकांची हत्या करायची आहे आणि त्यांचा आणखी कोणता कट आहे याची माहिती घ्यावी आणि सरकारने हा विषय गंभीरतेने घेवून तात्काळ या संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
'वैभव राऊत आमचा नाही'
एटीएसने नालासोपारा येथे धाड टाकून अटक केलेला वैभव राऊत हा सनातनचा साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे असा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलाय. यासोबतच वैभव राऊत याने असं काही केलं असावं असं मला वाटत नाही. त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही. त्याला लागेल ती सर्व मदत करु असं सांगताना पोलिसांवर आणि गृहखात्यावर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणालेत.