मुंबई: ठाकरे सरकारच्या बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार येत्या २४ तारखेला ठाकरे सरकारमध्ये नव्या मंत्र्यांना सामील करू घेतले जाईल. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तिन्ही पक्षांच्या मिळून एकूण २९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. यामध्ये शिवसेनेचे १० (७ कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री), राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ (८ कॅबिनेट+ ३ राज्यमंत्री) आणि काँग्रेसचे आठ आमदारांचा (६ कॅबिनेट+ २ राज्यमंत्री) समावेश आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेसमधून कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळेल, यावर शिक्कामोर्तब होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येक दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, यानंतर २२ दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.