नवी मुंबईतील २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
नवी मुंबईतील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार रद्द.
मुंबई : नवी मुंबईतील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला आहे. भाजप सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड यांना हा धक्का मानले जात आहे. या भूखंड व्यवहारावरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले होते.
कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी खारघर येथील मोक्याची २४ एकर जागा देण्यात आली होती. मात्र तात्काळ ही जमीन प्रकल्पग्रस्तांकडून भतीजा नावाच्या बिल्डरने कवडीमोल दराने विकत घेतली होती. कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या ८ प्रकल्पग्रस्तांना ही जमीन सरकारने दिली होती. भतीजा बिल्डरने लगेच ही जमीन प्रकल्पग्रस्तांकडून अवघ्या १५ ते २० लाख रुपये एकर दराने विकत घेतली. या व्यवहाराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप करण्यात आला होता.
तसेच या जमीन व्यवहाराप्रकरणी विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात गोंधळ घातला होता. त्यानंतर या व्यवहाराला फडणवीस यांनीच स्थगिती दिली होती. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही लावण्यात आली होती. आता नव्या सरकारने हा व्यवहारच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.