मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार करत आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. राज्यपाल यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल विमानाने 5 तारखेला नांदेडला जात आहेत, तिथे दोन हॉस्टेल सरकारने बांधले आहेत, ते अजून विद्यापीठाला हस्तांतरीत केले नाहीत. पण राज्यपालांनी सरकारला न विचारता दोन उद्घाटनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत, तिथे प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत. दुसर्‍या दिवशी हिंगोलीला कोणताही कार्यक्रम नसताना तिथे कोणतेही विद्यापीठ नसताना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेत आहेत, तर 6 तारखेला परभणीला जात आहेत, तिथे कृषी विद्यापीठ आहे त्यामुळे आमचा आक्षेप नाही, पण तिथेही पुन्हा संध्याकाळी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आढावा बैठक घेत आहेत, हा सरकारी कामात हस्तक्षेप आहे असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 


राज्यपालांकडून राज्यात सत्तेची दोन केंद्र असल्याचं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.  
जर एखादी माहिती त्यांना अपेक्षित असेल तर राज्याच्या मुख्य सचिवांकडून पत्राद्वारे माहिती मागवली पाहिजे. पण तसे न करता थेट राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर स्वतः करत आहेत. थेट तीन-तीन जिल्ह्यांमध्ये जाऊन, जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आपण आजही मुख्यमंत्री आहोत असं वाटतं. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल, असं ही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.