मुंबई : दिवाळी झाल्यानंतर आता राजकीय फटाके फुटायला सुरूवात झालीय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर चौकशीचा बॉम्ब फुटलाय. लोअर परळ इथल्या गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील (SRA Project) झोपडीवासियांचे गाळे हडप केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकरांची चौकशीही केली. यामुळं अडचणीत आलेल्या पेडणेकरांनी थेट गोमातानगरमध्ये जाऊन एसआरए गाळेधारकांशी संवाद साधला. गाळा हडप केल्याचं सिद्ध केलं तर स्वत: टाळं ठोकणार असं आव्हान त्यांनी सोमय्यांना दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर किशोरी पेडणेकरांना हिशेब द्यावाच लागेल असा पुनरुच्चार किरीट सोमय्यांनी केलाय. किशोरी पेडणेकर यांना कोणतेही गाळे दिले नसल्याची माहिती एसआरएकडून घेतली आहे, अर्धा डझन झोपडपट्टीवासीयांचे गाळे किशोरी पेडणेकर यांनी ढापले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसंच याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.


नेमकं मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Corporation Election) तोंडावर माजी महापौर अडचणीत आल्यात. त्यामुळे आता संजय राऊतांप्रमाणे (Sanjay Raut) ठाकरे गटाचा किल्ला लढवणाऱ्या पेडणेकरांसारख्या फायरब्रँड नेत्यांची  राजकीय कोंडी करण्याची व्यूहरचना आखण्यात आलीय की काय, अशी चर्चा आता सुरू झालीय.


'फायरब्रँड' पेडणेकर भाजपच्या रडारवर? 
संजय राऊत हे शिवसेनेचे फायरब्रँड प्रवक्ते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (PatraChawal Scam) ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये (Aurtur Road Jail) आहेत. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय. उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याच्या वादात शिंदे गटानं देसाईंवर आरोपांची तोफ डागलीय. आता संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्यापाठोपाठ पेडणेकरांच्या मागे चौकशीची ससेमिरा लागलाय. राऊत जेलमध्ये गेल्यानंतर ठाकरे गटाची बाजू मीडियात समर्थपणे मांडणाऱ्या किशोरी पेडणेकरच टार्गेट झाल्यात.


या सगळ्या वादानंतर पेडणेकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तुमच्यावर शिंदे गटाचा दबाव आहे का, असा थेट सवाल विचारला असता, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब (CM Eknath Shinde) सोबर माणूस आहेत, ते राजकीय दबाव आणणार नाहीत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलं. आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार हे, बिंदास चौकशी करा असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.


आरोपांच्या चक्रव्युहात अडकल्यानंतर आता पेडणेकरांची भाषाच बदलल्याचं दिसतंय. चौकशीच्या चक्रव्युहामुळं फायरब्रँड पेडणेकर आता मवाळ तर झाल्या नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.