विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे :  शवविच्छेदन (post mortem) नको म्हणून आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा मृत देह घेऊन बाप पसार झाल्याची घटना ठाणे पालिकेच्या (TMC) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (chhatrapati shivaji maharaj hospital) घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली होती. रुग्णालयाने पोलिसांना (Thane Police) याबाबत माहिती दिल्यानंतर मुलाच्या बापाचा शोध सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर मुलाच्या मृतदेहासह त्याच्या वडिलांना ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी रात्री 10: 30 च्या दरम्यान आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र आज पहाटे उपचारा दरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्या वेळी निमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचं आढळून आलं होतं. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावे लागेल अस डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर बाळाच्या बापाने विरोध केला आणि आपल्या त्याचा मृतदेह वॉर्डमधून घेऊन पळ काढला.


त्यानंतर बाळाच्या मृतदेहाला रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयन्त केला. मात्र रिक्षातून बाळाला बाप घेऊन गेला. दुसरीकडे त्याच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांनी पकडून ठेवलं होतं. ही घटना घडल्या नंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे. बाळाचा मृत देह रूग्णालयात आणण्यात आलेला आहे .


रुग्णालयाने काय सांगितलं?


"सूर्या सुधीर कुमार नावाच्या आठ महिन्याच्या मुलाला रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाला न्यूमोनिया होता. मुलाला खासगी रुग्णालयात सिरप देण्यात आलं होतं. मुलाल सिरपचा जास्त डोस देण्यात आला होता. रक्ताची तपासणी केली असता न्यूमोनिया पसरल्याचे दिसून आले. सकाळी सव्वा पाच वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. 24 तासाच्या आत मृत्यू झाल्याने कायद्याने शवविच्छेदन करावं लागतं. त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. सकाळी साडेसात वाजता नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी संभाव्य शवविच्छेदन नको या कारणामुळे मुलाला उचलून पळ काढला. खाली सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले होते. खात्री करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी वर फोन केला. त्यावेळी चार ते पाच नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांनी अडवून ठेवलं होतं. तोपर्यंत मुलाचे वडील त्याला घेऊन बाहेर रिक्षाने पळून गेला. पोलिसांना याबाबत माहिती दिली," अशी माहिती कळवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.


दरम्यान, एक महिन्यापूर्वी याच पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याचा चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे.