Thane News : धक्कादायक! दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग
Thane News : ठाण्याच्या प्रतिष्ठीत गोएंका स्कूलमधील खळबळजनक प्रकार; आरोपीला अटक.... पाहा सविस्तर वृत्त, कारण घडला प्रकार विचार करायला भाग पाडणारा
Thane News : ठाण्यातून एका धक्कादायक बातमीनं संपूर्ण पालकवर्गाच्या चिंतेत भर टाकली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या विनयभंगाच्या घटनेमुळं ठाणं हादरलं आहे. ठाण्यातील कापुरबावडी येथील सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल या प्रतिष्ठित शाळेच्या सहलीदरम्यान इयत्ता दुसरीच्या सात ते आठ विद्यार्थ्यांचा बसमध्ये विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. काही विद्यार्थ्यांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
सदर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी संतप्त होत शाळेत जाऊन जाब विचारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानंतर पोलिसांनी जावेद खान या आरोपीला अटक केली करून शाळेतील तीन शिक्षकांवर तातडीनं निलंबनाची कारवाई केली.
नेमकं काय घडलं?
ठाण्यातील सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची सहल घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये गेली होती. सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना एका खासगी कंपनीच्या बसगाड्यांमधून नेण्यात आलं. यापैकी एका बसमध्ये जावेद खान अटेन्डन्ट म्हणून काम पाहत होता.
विद्यार्थ्यांना खाद्यापदार्थाची पाकिटं वाटत असतानाच जावेदनं गैरवर्तन केल्याची तक्रार काही मुलांनी पालकांकडे केली. ज्यानंतर पालकांनी तातडीनं पोलिसांत धाव घेतली. पोलिसांमध्ये हे प्रकरण पोहोचताच त्यांनी तातडीनं आरोपीला ताब्यात घेतलं.
हेसुद्धा वाचा : Weather Update : देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ; महाराष्ट्रातील 'या' भागावर मात्र पावसाचं सावट
सोशल मीडियापासून सर्वत्र सध्या या खळबळजनक घटनेचीच चर्चा पाहायला मिळत असून, शाळेबाहेर पालकांनी बुधवारपासून आंदोलन करत शाळेमध्ये ठिय्या ठोकला. स्थानिक राजकीय नेते मंडळींनीही या घटनेची दखल घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये हयगय करणायर्या शिक्षकांना खडे बोल सुनावत शालेय व्यवस्थापनाला जाब विचारला. दरम्यान, घडला प्रकार अत्यंत वाईट असून, याप्रकरणी शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याच्या माहितीलाही व्यवस्थापनानं दुजोरा दिला.
फक्त सहलीसाठीचीच बस नव्हे, तर सध्या अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी अशा वाहनांतून प्रवास करतात. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही काही व्यक्तींवर असते. पण, त्यातही असे गैरप्रकार घडत असल्यामुळं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.