मुंबई : मनी लॉन्ड्रींग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काल ईडीने अटक केली. PMLA कोर्टाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिक यांच्या अटकेचे पडसाद
नवाब मलिक यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. महाविकास आघाडीचे मंत्री,आमदार, कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ आंदोलनाला बसले आहेत. महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीकडून अटकेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. 


या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रस आणि काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्री आणि नेते उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, सतेज पाटील, आदिती तटकरे, जयंत पाटील, सुनील केदार, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. आंदोलनात नवाब मलिक यांचं कुटुंबीयही सहभागी झालं आहे. तसंच राज्यभरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.


शिवसेनेच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती
दुसरीकडे शिवसेनेचे बडे नेते मात्र गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेकडून सचिन आहिर, यामिनी जाधव, मनीषा कायंदे, सुनील राऊत, स्नेहल अंबेकर, पांडुरंग सकपाळ उपस्थित आहेत. तर सुभाष देसाई वगळता एकही मोठा नेता या आंदोलनात सहभागी झालेला नाही. 


शिवसेना नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती आहे. 


मलिक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
नवाब मलिक यांचं कुटुंबीय दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरून ई डी कार्यालयाकडे रवाना झालं. नवाब मलिक यांची बहीण नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांनी आपल्या भावावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. त्याच बरोबर कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता त्यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं नवाब मलिक हे लढवय्ये आहेत ,सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे


भाजपही आक्रमक, आंदोलन करणार
एकीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय मविआ सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजीनाम्याच्या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन केलं जाणार आहे.