`परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० गुण आणि एक तासाची असेल`
विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरुंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी बैठक घेतली होती. परीक्षा कशा प्रकारे घेता येईल यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे. राज्यपालांच्या कालच्या बैठकीनंतर कुलगुरुंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे सादर केला आहे. विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० मार्कांची आणि एक तासाची असेल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
कुलगुरुंच्या समितीकडून अहवाल आला असून तो विद्यापीठाकडे पाठवण्यात येणार आहे. विद्यापीठ अकादमी काऊंसिल आणि परीक्षा बोर्डात यावर चर्चा करतील आणि आपलं मत सांगतील. यासाठी ११ शिफारशी केल्या आहेत. कोरानाची स्थिती लक्षात घेता आरोग्याची काळजी घेऊन नियोजन करावे. विद्यार्थी घरी बसून परीक्षा देतील असे नियोजन करावे ही पहिली शिफारस करण्यात आली आहे.
परीक्षेचं वेळापत्रक आणि परीक्षेची पद्धत ७ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी राज्य सरकारला कळवावी. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान घ्याव्या. कमी कालावधीच्या परीक्षा घ्याव्या. ऑनलाइन घ्याव्या, जिथे ऑनलाइन शक्य नसेल तिथे ऑफलाईन घ्याव्यात. एम क्यू आर, ओपन बूक, असाईनमेन्ट बेस असे पर्याय वापरुन परीक्षा घ्यावी. विद्यापीठाचे काऊंसिल बोर्ड, परीक्षा बोर्ड यांनी यापैकी कोणता पर्याय वापरणार ते शासनाला कळवावे.
प्रात्यक्षिक परीक्षा आणि व्हायवासाठी स्काईप, अन्य मिटींग अॅप्स किंवा टेलिफोनचा वापर करावा. ३१ ऑक्टोबपर्यंत विद्यापीठांनी निकाल जाहीर करावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत, वेळापत्रक विद्यापीठांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांना कळवावे अशीही शिफारस करण्यात आली आहे. परदेशी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी याच परीक्षा असतील, मात्र प्रोव्हिझनल प्रमाणपत्र त्यांना दिलं जाईल. हा अहवाल तातडीने विद्यापीठांकडे पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.