मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता प्लाझ्या थेरपीचा आधार घेण्यात येत आहेत. जे कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झालेत आहेत. त्यांच्या प्लाझ्मा घेऊन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून याला मान्यता देण्यात आली आहे. या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.



राज्यात १७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले


राज्यात काल कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


गुरुवारी राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.