मुंबई : घटस्थापनेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा आज त्यांची पहिली यादी जाहीर करणार आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल दिल्लीत पार पडली. त्यात युतीबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनेही ओबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. युतीबाबतचा निर्णय मुंबईतच जाहिर करण्यात येणार आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत निर्णय झाला नसल्याने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह आहे. 


दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.  


भाजपाची आज चौथी मेगा भरती होणार आहे. काँग्रेसचे सहा नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले मालाडमधील आमदार अस्लम शेख यांचा समावेश आहे. याशिवाय, राहुल बोंद्रे (बुलढाणा), काशीराम पावरा (धुळे), डी.एस. अहिरे (धुळे), सिद्धराम म्हेत्रे (सोलापूर) आणि भारत भालके (पंढरपूर) हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. मात्र राणेंचा प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे.