मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. आता तर मान्सूनही दारात येऊन ठेपला आहे. पावसामुळे मुंबईकरांची उडणारी दाणादाण आणि त्यातच जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर मुंबई महापालिकेला दुहेरी संकाटाला सामोरे जावं लागेल. मात्र मुंबई महापालिका पावसाळ्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यास सज्ज आहे. रूग्ण वाढल्यास स्थिती हाताळण्यास मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने कोरोनाच्या चाचण्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीचा कोरोना परिस्थिती हाताळण्याचा अनुभव महापालिकेला आहे. त्यासाठी मुंबईकरांनी कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करणे अपेक्षित आहे. मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पालन करणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रुणांमध्ये जर अशीच किंवा यापेक्षा अधिक वाढ होत राहिली तर कोरोनाच्या वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली आहे. सध्या दररोज कोरोनाचे २० पेक्षाही कमी रूग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी फक्त कोरोनाच्या नियमावलीचे पालन करावे हे अपेक्षित आहे. यापेक्षाही आव्हानात्मक परिस्थिती मुंबई महापालिकेने हाताळली आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी सध्याच्या परिस्थितीत अधिक चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेची रूग्णालये तसेच खासगी रूग्णालये अशी मुंबईत १५०० बेड्सची सुविधा कोरोना रुग्ण वाढल्यास उपलब्ध करुन दिली जाणार आहे.  सध्या मुंबई महानगरपालिकेकडून ८ हजार कोरोना रूग्णांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्या आगामी काळात २५ हजारांपर्यंत वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


परिस्थिती नियंत्रणाबाहेर नाही - मुंबई महापालिका


मुंबईत सध्या दररोज ५०० रूग्ण आढळत आहेत. त्यापैकी अनेक रूग्ण हे लक्षणे नसलेले रूग्ण आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती धोकादायक नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेकडे पावसाळ्यातील कोरोना परिस्थितीला हाताळण्यासाठी पुरेशी यंत्रणा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याआधी कोरोनाच्या परिस्थिती हाताळली आहे. याआधीचा अनुभव पाहता पालिकेची यंत्रणा चौथी लाट हाताळण्यासाठी सज्ज आहे. तसेच ऑक्सिजनच्या बाबतीतही कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.