मुंबई : BJP Leader Kirit Somaiya Medical Report : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या कारवर शिवसैनिकांनी दगडफेक केली, असे सांगत मला मारण्यासाठी कट होता, असा दावा त्यांनी केला होता. त्याचवेळी मला मोठी जखम झाली, असे म्हटले होते. मात्र, सोमय्या यांची जखम ही कृत्रिम असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणकर यांनी केला आहे. सोमय्या यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं घडवून आणलं. ही जखम नाही, तसेच साधा ओरखडाही म्हणता येणार नाही, असेही पेडणकर म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शनिवारी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल भाभा हॉस्पिटलकडून मुंबई पोलिसांना सादर करण्यात आला आहे. सोमय्यांची जखम 0.1 सेमीचा कट आहे. सूज नाही, रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात नाही, असं अहवालात म्हटले आहे. तसेच कोणतीही मोठी दुखापत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. हल्ला झाला त्यावेळी सोमय्या यांनी शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. 



दरम्यान, सोमय्या यांनी हल्ल्याच्या मुद्द्यावर दिल्लीवारी केली आणि केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन राज्य सरकारविरोधात तक्रार केली होती. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. एक माथेफिरु सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत आहे. अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.


सोमय्या विरुद्ध मुंबई पोलीस वाद 


किरीट सोमय्या यांना केंद्राची झेड सिक्युरिटी असताना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी ती सिक्युरिटी कुठे होती याची चौकशी करावी, असे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांनी CISF महासंचालकांना लिहिले आहे. सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा CISF नं मुंबई पोलिसांना जाब विचारला होता. त्याला आता मुंबई पोलिसांनीही जशास तसं उत्तर दिले आहे. 


किरीट सोमय्यांवर हल्ला होताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करा, अशा आशयाचे पत्र मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी CISFच्या महासंचालकांना लिहिल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता सोमय्या विरुद्ध मुंबई पोलीस असे पुन्हा एकदा चित्र निर्माण झाल्याचं स्पष्ट होतंय. मुंबई पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्राला सीआयएसएफचे महासंचालक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 


दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची भेट घेतली आहे. या भेटीत किरीट सोमय्या, नवनीत राणा प्रकरणावर चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चर्चेनंतर अजून व्हिडिओ शेअर करण्याची शक्यता. नवनीत राण यांच्या आरोपांना उत्तर देण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगितले जात आहे.


 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट संजय पांडे घेणार आहे. मुंबईत किरीट सोमय्या - नवनीत राणा प्रकरण गाजत असताना चर्चा करायला पांडे हे वळसे यांच्या भेटीस गेले आहेत. काल मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांनी नवनीत राणा यांचे चहा पिताना व्हिडिओ शेअर केला होता. मुंबई पोलिस याकडे अजून काही व्हीडीओ असून ते लवकर शेअर करण्साची शक्यता आहे.