मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नावाची पाटी बदलण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे असे संपूर्ण नाव पाटीवर लिहिण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वीच ही सर्व तयारी करण्यात आली आहे. कार्यलयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. आजपासून महाविकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकासआघाडीचे उद्धव हे प्रमुख आहेत. राज्याच्या इतिहासात वेगळ्या विचारसरणीचे तीन राजकीय पक्ष एकत्र येत ही आघाडी स्थापन केली. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ते सरकारचे मार्गदर्शक असणार अशीच चर्चा आहे.



शिवाजी पार्कवर झालेल्या या भव्य सोहळ्याला देशभरातले राजकीय नेते एकत्र आलेच होते पण त्याचवेळी उद्योगक्षेत्रातले मान्यवर आणि बॉलिवूड कलाकारही अवतरले होते. व्यासपीठावर देशाच्या राजकारणातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी झालेली पाहायला मिळत होती. उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांना व्यासपीठावर अगदी पहिली मानाची जागा देण्यात आली होती. त्यांच्या शेजारी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. जोशींच्या शेजारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांच्या शेजारी ही सर्व समीकरणं जुळवून आणणारे, नव्या राजकीय नाट्याचे नेपथ्यकार शरद पवार विराजमान होते. शिवसेनेची या काळातली मुलुखमैदान तोफ अशी ख्याती मिळवलेले संजय राऊत, कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांची एकत्र पोझ चर्चेचा विषय होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सोहळ्याला उपस्थित होते. 


सुप्रिया सुळे यांचं राजकीय वजन वाढल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून येतंय. राजकीय सत्तापटलावर विरोधकांसोबतच अजित पवारांना समजावण्यातही सुळेंचा वाटा महत्त्वाचा राहिलाय. व्यासपीठावर डीएमकेचे स्टॅलिन असतील, काँग्रेसचे कमलनाथ असतील. सर्वांचं स्वागत करण्यात सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले छगन भुजबळ हे समीकरणही चर्चेचा विषय होतं. भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या उद्धव ठाकरेंची एन्ट्री एकदम ग्रँड होती. व्यासपीठावर नीता अंबानींनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नीता अंबानींनी आदित्य ठाकरेंशी अगत्याने साधलेला संवादही पाहण्यासारखाच होता. 



शिवाजीपार्कवर भव्य संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी अक्षरशः दंडवत घातला. तामीळ अस्मितेचं राजकारण करणाऱ्या डीएमकेचे नेता एमके स्टॅलिन यांनी मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट लक्षणीय होती. राजकारणाव्यतिरिक्त ठाकरे परिवारासाठी काही हवळे क्षणही यावेळी अनुभवायला मिळाले. राज ठाकरेंच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या काकू आणि मावशी अशी दोन्ही नाती निभावणाऱ्या मंदाताई ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना प्रेमाने जवळ घेतले.


उद्धव ठाकरेंनीही मंदाताई ठाकरेंना पाया पडून नमस्कार केला. त्यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे या कुटुंबाची पोझ क्लिक ऑफ द डे ठरली. राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेटही चर्चेचा विषय होती. युपीएच्या नेत्यांनी राज ठाकरेंचं प्रेमाने केलेलं स्वागत देशाच्या राजकारणात युपीएला नवा मित्र लाभल्याचं दाखवत होतं. अर्थात सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक मात्र हातात बाळासाहेबांचा फोटो आणि मनात त्यांची आठवण घेऊन या सोहळ्याचा साक्षीदार झाला होता.