मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्णवाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात बाधित रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सौम्य, मध्यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पुरेशा संख्येने खाटांची गरज भासणार आहे. यासाठी महापालिकेने गेल्यावर्षीप्रमाणेच रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खासगी रुग्णालयांमध्येही राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर दोन आठवड्यांपासून दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
 
त्यामुळे मुंबईत महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला. मुंबईत सध्या 21 हजार 335 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आहे. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.  राज्यात गेल्या 24 तासात २७ हजार १२६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत 92 बाधितांचा मृत्यू झाला असून मुंबईत 2 हजार 982, तर नाशकात 1 हजार 872 रुग्ण वाढले आहेत.