मुंबईकरांना दिलासा; शहरातील कन्टेन्मेंट झोनच्या संख्येत घट
कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखायला मदत झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुगण्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचं संक्रमण रोखायला मदत झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या १ हजार ३६ पर्यंत पोहोचली होती. पण आता ही संख्या कमी होवून ८०५ वर आली आहे. म्हणजे आता मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या २३१ ने कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा रूग्ण न सापडल्यानं हे २३१ कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहेत.
मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ४०७ इतका झाला आहे. येत्या १५ मे पर्यंत मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ७० हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डमध्ये कोरोनाचे १०० पेक्षा अधिक रूग्ण आहेत. वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात आतापर्यंत सर्वाधिक ६०० रूग्ण तर ई विभागात ४६६ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
भारतामध्ये कोरोनाच्या संक्रमणातून बाहेर पडलेल्यांचं प्रमाण २२ टक्के झालं आहे, हेदेखील इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन यांनी दिली. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट व्हायचा वेगही कमी आहे. सध्या हे प्रमाण १०.५ दिवस एवढं आहे.
कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे देशात २८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तर ६४ जिल्ह्यांमध्ये मागच्या ७ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.