मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असल्यानं दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात २४ हजार ९४८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५ हजार ६४८ जण कोरोनावर मात करुन घरी परतले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचा दर ९४.६१ टक्के इतका झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूच्या आकड्याने चिंता वाढवली
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूच्या आकड्यात वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात गेल्या चोवीस तासात १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. सहा ऑक्टोबरनंतर मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ इतका आहे. 


राज्यात ओमायक्रॉनचे नवे रुग्ण
राज्यात ओमायक्रॉन रुग्णांमध्येही वाढ झाली असून आतापर्यंत ३ हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीसत तासात राज्यात ओमायक्रॉनचे ११० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संखया ३ हजार ४० इतकी झाली आहे. यापैकी १ हजार ६०३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.


मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात १ हजार ३१२ रुग्ण आढळून आले. आज कोरोनामुक्त रुग्णांची संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात ४ हजार ९९० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रुग्ण बरं होण्याचा दर ९७ टक्के इतका झाला आहे.