मुंबई : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी होणार असली तरी, शिवसेनाही मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये घुसून भाजपला आणि पर्यायाने मोदींना टक्कर देण्याचा शिवसेनेचा विचार असून, त्या दृष्टीने सेनेच्या गोटात हालचाली सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपच्या राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून निवडणूक लढवावी की हार्दिक पटेल यांच्यासारख्या मोदी विरोधकांना पाठिंबा देण्यासाठी दौरा करावा, याबाबतचा अंदाज शिवसेनेकडून घेतला जातोय. मुंबई महापालिका निवडणुकीत हार्दिक पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. त्याची परतफेड करण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातमध्ये पटेलांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच असेल, असंही पक्षातून स्पष्ट केलं जातंय.


अर्थात गुजरातमध्ये निवडणुक लढविण्याची शिवसेनेची ही काही पहिलीच वेळ नाही. शिवसेनेने यापूर्वीही दोन वेळा गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवली आहे. गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नाही. तरीही भविष्यातील तरतूद आणि राष्ट्रीय पक्षांविरूद्ध आपले उपद्रवमुल्य वाढविण्यासाठी शिवसेनेने अलिकडील काळात महाराष्ट्राबाहेर पाऊल ठेवले आहे. शिवसेनेने या आधी गोवा, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुक लढवली आहे. भाजपचे आक्रमक राजकारण पाहता आपल्याला आपली व्याप्ती वाढवावी लागेल. हे ओळखून शिवसेना नेतृत्व तयारी करताना दिसत आहे.