Hijab Controversy : कर्नाटकातल्या हिजाब वादाचे जोरदार पडसाद गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झालीत.  मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्यात. हिजाब दिन पाळण्याचं आवाहन केलं जातंय. या सगळ्यामागं नेमकी काय मानसिकता आहे? महाराष्ट्राची माथी कोण भडकवतंय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातल्या शाळा-कॉलेजातल्या हिजाब वादाचं लोण बघता बघता महाराष्ट्रातही पसरलं.  कर्नाटकात विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली.  त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत.


मालेगावात मुस्लिम महिलांनी दोनदा मोठा मोर्चा काढला. शुक्रवारी मालेगावात हिजाब दिन पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. पोलिसांनी वेळीच कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानं इथं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र हिजाबच्या भूमिकेवर मुस्लिम संघटना ठाम आहेत.


मालेगावपाठोपाठ शुक्रवारी मुंबईजवळच्या मीरा रोडमध्येही जोरदार निदर्शनं करण्यात आली. शेकडो महिला हिजाबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या. अल्ला हू अकरबरचे नारे देत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.



अमरावती शहरातही एमआयएम आणि इतर मुस्लिम संघटनाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी अमरावती शहरात दंगल उसळली होती. त्यामुळं आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली. 


पुण्यात गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं तर शुक्रवारी काँग्रेसनं हिजाबच्या समर्थनात जोरदार निदर्शनं केली. 


कर्नाटकातला हा वाद खरं तर तिथंच मिटायला हवा. पण यानिमित्तानं महाराष्ट्रात माथी भडकवण्याचं काम तर कुणी करत नाही ना, अशी शंका आता घेतली जातेय. हिजाब वाद आता हिंदू -मुसलमानवर येऊन ठेपला असून महाराष्ट्रानं या धार्मिक विद्वेषाला बळी पडता कामा नये.