दलित समाज आंदोलनाने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली
कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.
अमित जोशी / मुंबई : कोरेगाव भीमामधील घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे. या घटनेमुळे भाजपबरोबर असलेल्या आरपीआय नेते रामदास आठवले यांची मात्र चिंता वाढणार आहे.
दलित समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर राज्यातील भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकामागून एक गट भाजपावर नाराज होतायत. त्यामुळे व्होटबॅक टीकवण्यासाठी भाजपाला नव्याने मांडणी करण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र बंद प्रचंड यशस्वी
भीमा-कोरगांव प्रकरणावरुन बुधवारी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाचा महाराष्ट्र बंद प्रचंड यशस्वी ठरला. त्यामुळेच रात्री लगेच भाजप नेत्यांची एक महत्वाची बैठक मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत डॅमेज कंट्रोल करण्याबाबात चर्चा झाली. याचं कारण गेल्या काही महिन्यांतील विविध घडामोडींमुळे सत्तेत असलेल्या भाजपामध्ये अस्वस्थतता वाढली आहे. व्होटबॅक टीकवण्याबाबातची ही अस्वस्थता आहे.
शेतकरी-मराठा-दलित-धनगर समाज नाराज
राज्यातला शेतकरी सरकारवर नाराज आहे. पुन्हा संपाच्या तयारीत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजामध्ये नाराजी आहे. तर धनगर समाजही अद्याप आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. या नाराजीमध्ये आता दलित समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाची भर पडलीये. शेतकरी-मराठा-दलित-धनगर समाज २०१४च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपाच्या बाजूने उभा राहिला होता. आता हे सर्व घटक सरकारवर नाराज असल्याचं चित्र आहे.
ओबीसी नेत्याचा पक्षाकडे अभाव
त्यातच जनमान्यता असलेला गोपीनाथ मुंडेसारखा ओबीसी नेत्याचा पक्षाकडे अभाव आहे. विविध जातींचं समीकरण जुळवण्याचा गुजरातमध्ये केलेला प्रयोग काँग्रेस आता महाराष्ट्रातही राबवू शकतो, अशी भीती भाजपाला आहे.
शेतकरी कर्जमाफी पासून समृद्धी महामार्गापर्यंत अनेक निर्णय भाजपानं घेतले असले तरी समाजातील वाढती अस्वस्थता आता स्पष्ट दिसू लागली आहे. त्यातच विरोधकांची एकजुट आणि शिवसेनेची फटकून वागणारी भुमिका यामुळे भाजपाची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे भाजपाला आपली व्होटबॅक टिकवण्यासाठी नव्यानं आराखडे बांधावे लागणार आहेत.
विधानसभेतील १२२ चा आकडा टिकविणे कठीण?
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील जातीय समिकरणे वेगाने बदलत आहेत. त्यामुळेच यापुढच्या काळांत भाजपाला सध्याचा विधानसभेतील १२२ चा आकडा हा वाढवणे सो़डाच पण टिकवणेसुद्धा अवघड जाणार आहे. विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला तरी सत्तेत असलेल्या भाजपापुढील यापुढचा मार्ग आणखी खडतर असणार आहे.