मुंबई : एकीकडे संपूर्ण मुंबई नववर्षाचे स्वागत करीत असताना घाटकोपरमध्ये चोरट्यांनी या संधीचा फायदा उचलत रोकड आणि दागिने लंपाल केलेत. जवळपास १० ते १२ कुटुंबीयांना नवीन वर्षांचे स्वागत करणे चांगलेच महागात पडले आहे. घाटकोपर येथील साईनाथनगर रोडला लागून असलेल्या बैठ्या चाळींमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल दहा ते बारा घरात घरफोडी झाली आहे. या घडफोडीमुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरफोडी झालेल्या अनेक घरातील कुटुंब हे फिरायला गेलेले होते. तर काही कुटुंब पोटमाळ्यावर झोपली होती. चोरांनी घरात कोणी नाही, अशा घरांवर पाळत ठेवून या घरफोड्या केल्या आहेत. बाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून चोरांनी कडीकोंडे तोडून घरात शिरले. तसेच कपाट आणि तिजोरी फोडून त्यातून अनेकांची रोकड, दागिने लंपास केले. घटनेची सकाळी माहिती मिळताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरु आहे. परंतु एकाच रात्रीत एकाच विभागात एवढ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.