मस्जिदीवर आहेत भोंगे, म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे... कोण म्हणाले पहा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरले नाही तर हनुमान चालीसा वाजवू... असा खणखणीत इशारा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
आज हनुमान जयंती निमित्त मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अनेक मंदिरात 'हनुमान चालीसा'चे पठण केले. तर, त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केलंय.
मनसेच्या समर्थनासाठी भाजप कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, मनसेच्या या कृतीला भाजपचे समर्थन करणाऱ्या रामदास आठवले यांनी विरोध केलाय.
रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'वाद निर्माण करणारी गोष्ट कोणी करू नये. बोलत असताना आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे, असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
हिंदू धर्माच्या वाढीसाठी राज ठाकरे यांना जे काही करायचं आहे ते त्यांनी करावं. मात्र, 2 धर्मात वाद होईल असे त्यांनी करू नये, असे सांगतानाच खास आठवले शैलीत त्यांनी 'मस्जिदीवर आहेत भोंगे, म्हणून बाकीच्यांनी करू नयेत सोंगे...' असा शब्दात त्यांनी मनसे आणि भाजपाचाही समाचार घेतला.