मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या निवेदनात शेतकरी कर्जमाफीचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीकडून एक निवेदन प्रकाशित करण्यात आलं आहे. ते शपथविधीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना देण्यात आलं. किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिककर्ज माफी किंवा सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. पण या निवेदनात याविषयी कोणताही स्पष्ट उल्लेख दिसत नाही. महाराष्ट्र विकास आघाडीकडून शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पहिली कॅबिनेट आज होणार आहे, या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय होण्याची शक्यता तशी नाही. पण पुढच्या कॅबिनेटमध्ये विचार विनिमय करून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्टीकरण यावर दिलं आहे.



मात्र किमान समान कार्यक्रमात काही घटक केंद्रस्थानी असणार आहेत, यात शेतमजूर, शेतकरी, व्यापारी, लघु, मध्यम व मोठे उद्योग, तसेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार तसेच सर्व जाती धर्म, प्रादेशिक विभाग, एससी, एसटी, ओबीसी, धार्मिक आणि अल्पसंख्याक सामाजिक गट.


आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.