मंत्रिमंडळात बदल होणार नाही, कोणीही नाराज नाही - शरद पवार
शरद पवार यांनी दिला विविध चर्चांना विराम...
मुंबई : एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये आल्याने त्यांनी मंत्रीपद मिळणार का अशा चर्चा सुरु होत्या. इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रीपद खडसेंना दिलं जाणार अशी देखील चर्चा होती. पण याला खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नसून पक्षात कोणीही नाराज नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
'एकनाथ खडसे कोणतीही अपेक्षा ठेवून आलेले नाहीत. आज बातम्या आल्या मंत्रीमंडळात बदल होणार, याचं खातं त्याला त्याचं खातं याला
पण मंत्रिमंडळात काहीही बदल होणार नाही जे आहेत ते त्या ठिकाणी राहतील.' असं पवारांनी आज स्पष्ट केलं आहे.
एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश झाला. आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. याआधी अजित पवार हे देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण त्याला देखील पवारांनी पूर्णविराम दिला आहे. 'कोरोना काळात काळजी घ्यावी लागते. जनतेशी बांधिलकी आहे. जितेंद्र आव्हाड, मुंडे, बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाला होता. सगळ्यांच्या बाबत काळजी घेत आहोत. अधिक खबरदारी घेत आहोत. सहकारी आले नाही तर काही गडबड नाही.' असं पवारांनी म्हटलं आहे.