COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या माटुंग्याच्या अरोरा सिनेमागृह परिसरात एका आठवड्यात ३ बेघरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि मुलभूत अधिकारांचं हनन झाल्यानं, बेघरांचा प्रश्न गंभीर होत चालल्याचंच या घटनेतून दिसून आलंय.


तुच्छतेची वागणूक


वेलु कुमार नायडू हा २७ वर्षाचा युवक, क्षयरोगामुळे बोलण्याची आणि शारिरीक हालचाल करण्याची ताकदही नसल्यानं २३ जुलैला खंगून मृत्यू पावला. बेघर असल्यानं सरकारी रुग्णालयातही आपल्याला तुच्छतेची वागणूक मिळत असल्याची खंत, बेघर व्यक्त करतात.


निवाऱ्याचा प्रश्न गंभीर 


 २८ जुलैला बेघर असलेल्या ६३ वर्षांच्या मूर्ती सुंदर नायडू आणि आणखी एका रस्त्यावर राहणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. कोणीही नातेवाईक नसल्याने 'युवा' संस्थेच्या कार्यकर्त्यांनीच या दोघांवर अंत्यसंस्कार केले. मुंबईच नव्हे देशभरात बेघरांच्या आरोग्य आणि निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय.  अशा मृतांमध्ये टीबी किंवा एच आय व्हीग्रस्तांचे प्रमाण जास्त असतं. निवारा आणि योग्य उपचार असतील तर त्यांचा जीव वाचू शकला असता.