काय म्हणाल? बलात्कार, हनीट्रॅप, मनीट्रॅप की, फिर हेराफेरी..!
धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणात नवनवीन मुद्दे समोर येत आहेत, टी२० मॅच सारखे या प्रकरणात नवनवीन वळणं येत आहेत.
मुंबई : धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणात नवनवीन मुद्दे समोर येत आहेत, टी२० मॅच सारखे या प्रकरणात नवनवीन वळणं येत आहेत. रेणू शर्मा या महिलेविरोधात भाजपा आणि मनसेच्या नेत्याने हॅनीट्रॅपसारखा प्रकार केल्याचा आरोप केल्यानंतर, आणखी एका जेट एअरवेजमध्ये काम करणाऱ्या रिझवान कुरेशी या व्यक्तीने वर्षभरापूर्वीच रेणू शर्माविरोधात तक्रार केली आहे. पैसे देणे बंद झाल्यानंतर ही महिला पोलिसांत तक्रार करते असा आरोप कुरेशी यांनी केला आहे.
रेणू शर्मा या महिलेने राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात टीव्ही मालिकांसारखे एकानंतर एक भाग दररोज पुढे येत आहेत.
एकंदरीत धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरण आता वेगळ्या दिशेने जात आहे, हे प्रकरण हनीट्रॅप की मनीट्रॅप हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार आहे.
शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांशी चर्चा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली असल्याचं बोललं जात आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहाकडे निघाले होते, तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी विश्वास नांगरे पाटील चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपा नेते कृष्णा हेगडे यांचीही तक्रार
भाजपाचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा या महिलेविरोधात आपण तक्रार देणार असल्याचं सांगितल्यानंतर, मनसेचे नेते मनिष धुरी हे देखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी म्हटलं आहे की, ही महिला मैत्री करण्यासाठी पुढे येते, आणि असं वाटतं की, ही महिला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. धनंजय मुंडे यांच्यावर या रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत.
मनसेचे मनीष धुरीही तक्रार करणार
या प्रकरणी कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्यात आणि माझ्यात मैत्री नाही. मी त्यांना ते आणि मी आमदार असताना दोन तीन वेळेस भेटलो असेल. एका महिलेने असं कुणासोबत गंभीर आरोप केलेले आहेत, असं होवू नये, यासाठी मी तक्रार करण्यास पुढे आलो असल्याचं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.
हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाहीय, मला हे पाहायचं नाहीय की, कोणता पक्ष आहे, आणि कुणावर काय आरोप, जे काही सत्य आहे आणि यापुढे कुणाची फसवणूक व्हायला नको, यासाठी मी सर्वांसमोर येऊन हे सांगतोय, आणि पोलिसांमध्ये तक्रार देत आहे, असं कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाईच्या कामाला लागला
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली प्रतिमा जपण्यासाठी जोर बैठकावर दिला आहे, शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर आहे, असं म्हटल्यानंतर धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची विकेट जाते की काय यावर प्रश्नचिन्ह लागू झालं आहे.