`नोव्हेंबरपासून कार्यालय तर जानेवारीपासून शाळा,कॉलेज सुरु व्हावी`
कार्यालय नोव्हेंबरपासून तर शाळा, कॉलेज जानेवारी २०२१ पासून सुरु करावी
मुंबई : मुंबईतील कार्यालय नोव्हेंबरपासून तर शाळा, कॉलेज जानेवारी २०२१ पासून सुरु करावी असा सल्ला टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ( टीआयएफआर) ने दिलाय. ट्रेसिंग, टेस्टिंग, कंटेन्मेंट झोन, आर्थिक स्थिती यावरील संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. टीआयएफआर स्कूल एंड
टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्षा आणि रामप्रसाद सप्तर्षी यांनी हा संशोधन अहवाल बनवालय. मुंबई महानगर पालिकेला हा अहवाल पाठवण्यात आलाय.
एकावेळी शाळा, कार्यालय सुरु करण्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ३३ टक्के, ऑक्टोबरमध्ये ५० टक्के आणि नोव्हेंबरमध्ये शंभर टक्के कार्यालये सुरु व्हावीत असा सल्ला संशोधन अहवालातून देण्यात आलायं.
शाळा, महाविद्यालय जानेवारी २०२१ ला सुरु करावीत. यावेळी सार्वजनिक वाहतुकीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि ठराविक कार्यालयीन वेळा असण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय. कार्यालये सुरु करताना स्वच्छता, शारिरीक सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क / फेस कव्हर, नियमित हात धुवणं या गोष्टी ट्रेन, कार्यालयात होणं गरजेचं आहे.
कोरोना रुग्णांमध्ये वाढ
राज्यात उच्चांकी २३ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
रविवारी एका दिवसात राज्यात ७,८२६ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ४४ हजार ४४० इतकी झाली आहे. राज्यातला रिकव्हरी रेट ७१,०३ टक्के आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख ७ हजार २१२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात २ लाख ३५ हजार ८५७ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण २६ हजार ६०४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्याचा राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत ४६,४७,७४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९, ०७,२१२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १४९६७२ जण होम क्वारंटाईनमध्ये असून ३८,५०९ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, आज सलग चौथ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. ३ सप्टेंबरला राज्यात १८ हजार १०५ कोरोनाबाधित आढळले होते. ४ सप्टेंबरला १९ हजार २१८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर ५ सप्टेंबर रोजी २० हजार ४८९ नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं.