कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई   : देशातील मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे वाढत असलेले व्यसन काळजी करायला लावणारे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कायदे अस्तित्वात असूनही त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यानं देशातील प्रत्येक पाचवा मुलगा हा या व्यसनांच्या आहारी गेल्याचे  धक्कादायक वृत्त समोर आले आहे . लहान वयात लागलेले हे व्यसन पुढे सुटणे कठीण होऊन बसतं. 


देशात 26.7 कोटी लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. यापैकी 90 टक्के लोकांना हे व्यसन त्यांच्या बालपणात लागलेले आहे. रोज देशातील 5 हजार 500 मुले तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास सुरुवात करतात. यामध्ये महाराष्ट्रातील 529 मुलांचा समावेश आहे. 


 बालदिनानिमित्त टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या वतीनं तंबाखूपासून लहान मुलांचे संरक्षण या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं. यावेळी तंबाखूपासून लहान मुलांना दूर ठेवण्यासाठी जागृतीबरोबर कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनीही कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं मुलांपर्यंत सहज तंबाखूजन्य पदार्थ पोहचत असल्याचं मान्य केलं.


 राज्यातील 75 टक्के शाळांचा परिसर तंबाखूमुक्त झाला असला तरी अद्याप 25 टक्के शाळांच्या परिसरात आजही तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. ज्युवेनाईल जस्टीस अँक्टनुसार मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकल्यास त्या संबंधित दुकानदाराला सात वर्षे कारावासाची शिक्षा होवू शकते. परंतु पोलिसांकडून याची अंमलबजावणी होत नसल्यानं गुन्हे दाखल होतच नाहीत. 


 तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं कॅन्सर आणि कॅन्सरमुळं मृत्यू हे चक्र संपणारं नाही. हे चक्र भेदण्यासाठी  आवश्यकता आहे ती म्हणजे मुलांना तंबाखूपासून दूर ठेवण्याची.