मुंबई : विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतरही भाजपा-शिवसेनेकडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे. उद्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता शिवसेना-भाजपा चर्चेची शक्यता मावळली असल्याचं चित्र आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौरा करणार आहेत. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवेळी, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पिक गेल्याने बळीराजा पुरता कोलमडला आहे. शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्या अकोला येथे दाखल होणार आहेत. चिखलगाव येथे ते ११.३० वाजता भेट देणार आहेत. 


उद्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आणि उद्याच्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा अकोला दौरा असल्याने शिवसेना-भाजपा चर्चेची शक्यता मावळल्याचं चित्र आहे.


  


शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे सुरु आहेत. राधाकृष्ण विखे-पाटलांचा नगर, आशिष शेलार सिंधुदुर्गात तर एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्याचे माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि राहाता तालुक्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतीची पहाणी केली.