मुंबई: अंदाज चुकण्यासाठी कायम चर्चेत असणारा हवामान विभाग गुरुवारी पुन्हा एकदा थट्टेचा विषय ठरला. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. मुंबई आणि रायगडमध्येही गुरुवारी पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, हवामान विभागाचा हा अंदाज सपशेल चुकल्याचे दिसून आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळू शकतात असा अंदाज व्यक्त केला होता. 


काल रात्री नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्हयांत विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे आजदेखील मुसळधार पाऊस असेल, अशी धास्ती सर्वांना लागून राहिली होती. परंतु, आज सकाळी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाच्या पूर्णपणे उलट परिस्थिती पाहायला मिळाली. मुंबई व उपनगरांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे हवामान विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. 


जुलै महिन्यातही हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वेचा गोंधळ उडाला होता. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बुधवारी मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालवायचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस न पडलाच नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा मध्य रेल्वेने हवामान विभागाकडे बोट दाखवले होते. 


मात्र, भारतीय हवामान खात्याचे (IMD) संचालक के. एस. होसाळीकर यांनी हा दावा फेटाळून लावला होता. ३ जुलैला मुंबईत मुसळधार पाऊस होणार नाही, हे आम्ही सर्व संबंधित यंत्रणांना आधीच कळवले होते. हवामानाच्या माहितीसाठी त्यांनी IMD च्या संकेतस्थळाला भेट द्यायला हवी, असा अप्रत्यक्ष टोला होसाळीकर यांनी लगावला होता.