कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: शहरातील नालेसफाई कितपत झाली आणि ती कशी झालेत हे आता एका क्लिकवर समजणार आहे. मुंबई महापालिकेनं 'MCGM 24x7' या ऍन्ड्रॉइड ऍपमध्ये सर्व नाल्यांची छायाचित्रे अपलोड केली आहेत. यामध्ये नालेसफाई करण्यापूर्वीची आणि झाल्यानंतरची छायाचित्रे तारीख आणि वेळेच्या उल्लेखासह 'अपलोड' करण्यात आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही छायाचित्रे आणि सदर ठिकाणची असणारी प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्यास नागरिक त्यांच्या मोबाईलद्वारे सध्याचे छायाचित्र अपलोड करुन कामातील विसंगती प्रशासनाच्या निदर्शनास आणू शकणार आहेत. त्यानंतर ही तक्रार आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिका-यांकडे ऑनलाईन पद्धतीनेच थेट जाणार असून तक्रारदारास त्यावर केलेल्या कारवाईची माहिती देणे, संबंधित अधिकारी वा कर्मचा-यांना बंधनकारक करण्यात आले आहे. 


यासाठी प्रथमत:  'MCGM 24x7' हे अँप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर त्यामधील डिसिल्टींग या विभागात जावून तुमच्या संबंधित विभागातील नाल्याची माहिती याद्वारे मिळू शकेल. तिथूनच तुम्हाला तक्रारही नोंदवता येणार आहे.


बृहन्मुंबई महापालिकेशी संबंधित विविध नागरी सेवा सुविधा विषयक कार्यवाही नागरिकांना अधिक सुलभपणे करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने तयार केलेले 'MCGM 24x7' हे ऍप आजवर एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना 'डाऊनलोड' केले आहे. हे ऍप आता आणखी अद्ययावत करण्यात आले असून यात नालेसफाई विषयक 'मोड्यूल' विकसित करण्यात आले आहे. या 'मोड्यूल' मध्ये बृहन्मुंबई महापालिका परिसरातील मोठ्या नाल्यांच्या ४६७ भागांची छायाचित्रे, तर छोट्या नाल्यांच्या ७९० भागांची छायाचित्रे विभागनिहाय पद्धतीने देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील जवळजवळ सर्वच नाल्यांची सफाईच्या आधीची व सफाईनंतरची छायचित्रे यात उपलब्ध आहेत. 


या मोड्यूल मध्ये उपलब्ध असलेल्या छायाचित्रांमध्ये व प्रत्यक्ष परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्यास नागरिक आपल्या भ्रमणध्वनीद्वारे प्रतिक्रिया नोंदवू शकणार आहेत.


'MCGM 24x7' हे 'ऍन्ड्रॉईड ऍप' गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असून यामध्ये नालेसफाई विषयक 'डिसिल्टींग' हे मोड्यूल नव्यानेच विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये हे ऍप पूर्वीपासून आहे, त्यांनी सदर ऍप अद्ययावत(Update) करणे आवश्यक आहे किंवा आधीचे 'ऍप' अनइन्स्टॉल करुन नव्याने सदर ऍप इन्स्टॉल करावे लागणार आहे. 


नेमकं काय करावं 


'ऍन्ड्रॉईड' भ्रमणध्वनीमध्ये असणारे 'गुगल प्ले' हे अॅप उघडावे. यामध्ये 'MCGM 24x7' हे ऍप शोधून (Search) ते 'इन्स्टॉल' करावे व त्यानंतर नोंदणी करावी.


'MCGM 24x7' या ऍपच्या 'होमस्क्रीन'वर'डिसिल्टींग' मोड्यूल आहे.


'MCGM 24x7' या ऍप मध्ये असणारे'डिसिल्टींग' मोड्यूल उघडावे. यामध्ये महापालिकेच्या २४ विभागांमध्ये असणारे नाले किंवा त्यांचे भाग इत्यादी तपशिल आहे.


वरील नुसार नाल्याशी संबंधित तपशिल उघडल्यावर त्यात सर्वात शेवटी नालेसफाईपूर्वीची व नालेसफाई झाल्यानंतरची छायाचित्रे बघण्यासाठी 'View' हा पर्याय निवडावा.


वरीलनुसार 'View' या पर्यायांतर्गत असणारे छायाचित्र व सध्याची परिस्थिती यात मोठ्याप्रमाणात विसंगती असल्यास त्याच पानावर सर्वात शेवटी 'Raise a Complaint'असा पर्याय आहे.


'Raise a Complaint' हा पर्याय निवडल्यानंतर उघडणा-या पानावर तक्रार नमूद करता येणार असून तक्रारीसह सद्यस्थिती मांडणारे छायाचित्र 'अपलोड' करता येणार आहे.


तसेच ज्या नाल्याविषयीची तक्रार नमूद करावयाची असेल त्या नाल्याच्या भागाचे निश्चित ठिकाण कळावे, यासाठी सदर पानावरच 'मॅप' (नकाशा) हा पर्याय देखील उपलब्ध आहे. या आधारे तक्रारीशी संबंधित निश्चित ठिकाण सहजपणे नमूद करता येणार आहे.


तक्रार नोंदविल्यानंतर ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिका-यांकडे ऑनलाईन पद्धतीनेच थेट जाणार आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदारास देणे हे संबंधित अधिकारी वा कर्मचा-यांना बंधनकारक करण्यात आले आहे.