तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करा; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
तुकाराम मुंढे यांनी कुठल्या विभागात रुजू व्हायचंय, हे मात्र अजून सांगण्यात आलेलं नाही. सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यावर सोपवून तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा असे आदेश नितीन गर्दे यांनी पत्राद्वारे तुकारम मुंढे यांना दिले आहेत.
Tukaram Mundhe : महाराष्ट्रतील बडे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे(Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या बदलीच्या आदेशामुळे. तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची प्रतिक्षा करा असे पत्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गर्दे यांनी तुकाराम मुंढे यांना पाठवले आहे. या पत्रावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याचे निश्चित आहे. पण, त्यांची बदली नेमकी कुठे झालेय हे मात्र, अद्याप जाहीर झालेले नाही. तुकाराम मुंढे हे सध्या कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई आयुक्तपदावर कार्यरत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांना या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. म्हणजे साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांच्या यादीत तुकारम मुंढे यांचे देखील नाव आहे. तुकारम मुंढे यांची आरोग्य खात्यातून अचानक बदली करण्यात आली आहे. सध्या तुकाराम मुंढेंकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि कुटुंबकल्याण आयुक्तपदाचीही जबाबदारी होती.
बायोमेट्रिकवर हजेरी लावा नाहीतर पगार मिळणार नाही... असे आदेश आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले होते.त्यामुळे आरोग्य खात्यातल्या दांडीबहाद्दर कर्मचा-यांचे धाबे दणाणले होते. मुंढे अॅक्शन मोडवर येताच त्यांची बदली करण्यात आलीय. तुकाराम मुंढे यांनी कुठल्या विभागात रुजू व्हायचंय, हे मात्र अजून सांगण्यात आलेलं नाही. सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यावर सोपवून तात्काळ कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा असे आदेश नितीन गर्दे यांनी पत्राद्वारे तुकारम मुंढे यांना दिले आहेत.
महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. तुकाराम मुंढे यांची जिथे बदली होते तिथे त्यांच्या कडक शिस्तीमुळे कर्मचारी अस्वस्थ होतात. यामुळेच कर्मचारी त्यांच्याविरोधात तक्रारी देखील करतात.