काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा कंत्राट देण्याचा डाव उधळला
कचरा घोटाळ्याचे गौडबंगाल अजुनही सुरुच आहे. काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु होता. मात्र हा डाव हाणून पाडण्यात आलाय.
मुंबई : कचरा घोटाळ्याचे गौडबंगाल अजुनही सुरुच आहे. काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु होता. मात्र हा डाव हाणून पाडण्यात आलाय.
'झी २४ तास'ने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यामध्ये कशा प्रकारे काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांना पुन्हा कंत्राटे दिल्याचे तसेच घोटाळेबाज जैन कुटुंबावर प्रशासन कसे मेहरबान असल्याचे समोर आणले होते. आता पुन्हा नालेसफाई घोटाळ्यात काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत होते.
परंतु बुधवारी स्थायी समितीत सर्वपक्षीयांनी या कंपनीला टेंडर देण्याचा प्रशासनाचा डाव उधळून लावला. गोराई कचरा हस्तांतरण केंद्र येथून मुलुंड, देवणार आणि कांजूर डंपिंग ग्राऊंडवर कचरा वाहून नेण्यासाठीचा ७ कोटी ९५ लाख रुपयाचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आणला होता.
मात्र हे कंत्राट २०१६ च्या नालेसफाई घोटाळ्यातील कंत्राटदारांना देण्याचा प्रयत्न पालिकेचा होता. कंत्राट देण्यात येणा-या सात पैकी सहा कंत्राटदारांचा पत्ता एकच मात्र नावे बदलली होती. हे कंत्राटदार ब्लड रिलेशनमधील असून २०१६ साली नाले सफाई कामांमध्ये ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले असल्याचे सदस्यांच्या लक्षात आल्यावर या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात आला. सर्वपक्षीय विरोधामुळे अखेर हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा लागला.