आजारपणाला कंटाळलेल्या पित्याकडून दोन मुलांची हत्या
`रात्री मुलांना गरबा पाहण्यासाठी घेऊन जातोय` असं सांगून चंद्रकांत गाडी घेऊन निघाला होता
घाटकोपर, मुंबई : घाटकोपरच्या इंदिरानगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपल्या आजाराला कंटाळलेल्या एका पित्यानं आपल्याच दोन मुलांची निर्घृण हत्या केलीय. मुलांच्या हत्येनंतर आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. परंतु, त्याआधीच या पित्याला पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत मोहिते असं या दुर्दैवी पित्याचं नाव आहे. पत्नी आणि दोन मुलांसोबत चंद्रकांत घाटकोपरच्या इंदिरानगर परिसरात राहत होता. परंतु, चंद्रकांतला क्षयरोग (टीबी) झाल्याचं निदान झालं... आणि तो मानसिकरित्या खचत गेला.
टीबी या रोगाचं वेळीच निदान झालं तर त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु, आपल्या आजारामुळे नैराश्यवस्थेत गेलेल्या चंद्रकांतला आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती. या नैराश्यवस्थेतच मुलांना ठार करून आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यात आला.
'रात्री मुलांना गरबा पाहण्यासाठी घेऊन जातोय' असं सांगून चंद्रकांत गाडी घेऊन निघाला होता. त्याने ११ वर्षीय मुलगी गौरवी मोहिते आणि ७ वर्षीय प्रतिक या मुलांना साताऱ्याच्या दिशेने नेले आणि रस्त्यातच गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:च नातेवाईकांना फोन करून 'मी आजारपणाला कंटाळलोय... माझ्यानंतर माझ्या मुलांचं पुढे काय होणार? त्यापेक्षा मी स्वतःच मुलांना मारून आत्महत्या करत आहे' असं म्हटलं. यामुळे धक्का बसलेल्या नातेवाईकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर चंद्रकांत यांची गाडी पोलिसांना शिरोळे टोल नाक्यावर आढळली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या भागात दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेहांना ताब्यात घेत चंद्रकांत याला अटक केली.