मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांचे हाल होत आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. धारावीत हातावर पोट असणारे अनेक कष्टकरी राहतात. हाताला काम नसल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. ही बाब लक्षात घेत धारावीतील दहा हजार कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत दाटीवाटीच्या गल्ल्या आणि कोरोनाच्या फैलावामुळे सर्व नागरीकांपर्यंत सोयी सुविधा पोहोचवण्यास प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी दोन लाख किलो अत्यावश्यक अन्नधान्य तसंच इतर वस्तूंचं सोमवारपासून स्थानिक सेवाभावींच्या साहाय्याने वाटप करण्यास सुरुवात केली आहे.


धारावीतील दहा हजार कुटुंबांना या शिधावाटपाचा लाभ होणार आहे. ५ किलो तांदुळ , ५ किलो पीठ, १ लीटर तेल, १ किलो तुरडाळ, १ किलो रवा, मसाला, मीठ, साबण इत्यादी गोष्टींचा समावेश दहा हजार शिधापिशव्यांमध्ये करण्यात आला आहे. धारावीतील कामराज ज्युनियर कॉलेजमध्ये शिधावाटप सुरु आहे. 



गेल्या अडीच महिन्यांत सुभाष देसाई आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील विविध भागातून स्थलांतरित झालेल्या लोकांना सुमारे तीन लाख किलो धान्य वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे. या मोफत धान्य वितरणामुळे संकटाच्या काळात अनेक कुटुंबांना मदत झाली आहे. 


दरम्यान, धारावीमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. धारावीत आज 38 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1621वर पोहचली आहे. धारावीमध्ये आतापर्यंत 50हून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.