समोर येऊन बोला आपण मार्ग काढू; उद्धव ठाकरे यांचे बंडखोर आमदारांना पुन्हा आवाहन
Maharashtra Political crisis | Eknath shinde | `कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही`. त्याचे कारण म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा भावनिक आवाहन केले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला नवीन वळण लागणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 'कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही'. त्याचे कारण म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा भावनिक आवाहन केले आहे.
शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत आघाडीत राहू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. सध्यातरी आमदारांकडे पुरेसे संख्याबळ असल्याने शिवसेना बॅकफूटवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॅमेज कन्ट्रोलच्या प्रयत्नात असलेले शिवसेना नेतृत्वाने पुन्हा बंडखोर आमदारांना पुन्हा आवाहन केले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय लिहलंय पत्रात ...?
आमदारांना आवाहन
शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही.
माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू.
कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.