मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले आहे. सध्या उद्धव ठाकरे दररोज राम मंदिराविषयी नवनवीन वक्तव्य करताहेत. शिवसेनेने यापूर्वी राम मंदिराचा मुद्दा गांभीर्याने घेतला नव्हता. मात्र, सध्या उद्धव ठाकरे राम मंदिराच्या नावाचा जप करताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यामागे राजकारण आहे. निवडणुका जवळ आल्यामुळेच आता उद्धव यांना राम मंदिराची आठवण झाल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली. 


उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते. निवडणुकीचा मुद्दा राम मंदिर असेल. तर तो तुमचा जुमला आहे. मंदिर वही बनायेगे पण तारीख नही बताये़गे. अयोध्येत कधी मंदिर बांधताय ते सांगा. राष्ट्रपतीची निवडणूक येते तेव्हा बाबरी मशिदची केस येते. कारण लालकृष्ण आडवाणी राष्ट्रपती होतील. १५ लाख जसा जुमला होता तसे जाहीर करा, राम मंदिर जुमला आहे. असे एकदा जाहीर करा. तुम्ही जगभर फिरताय, पण माझ्या देशाचा पंतप्रधान अयोध्येत का गेला नाही, असा थेट सवाल करत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.