मुंबई : महाराष्ट्रातील सरकार गमावल्यानंतर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेसनेही सवाल उपस्थित केला आहे. सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे सरकारने 164 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासह सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला. राज्यातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. वृत्तानुसार, काँग्रेसच्या एका सूत्राने सांगितले की, "एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याचा सल्ला दिला होता." सुरुवातीला बंड शांत होईल अशी चर्चा असल्याने ही सूचना करण्यात आली. मात्र दिवसेंदिवस अनेक मंत्री आणि आमदार शिंदे गटाच सामील झाल्याने सरकार वाचवणं अशक्य झाले होते.


मंगळवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव भाजप नेतृत्वाला दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास आपण मानसिकदृष्ट्या तयार नसल्याचेही त्यांनी मान्य केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला.


विशेष म्हणजे फडणवीस हेच मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यता होती. मात्र त्यांनी शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे ही सांगितले होते. पण नंतर पक्षाच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री झाले.


महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत, मात्र शिवसेनेच्या एका आमदाराच्या मृत्यूनंतर ही संख्या 287 वर आली होती. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी 144 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टमध्ये शिंदे सरकारच्या बाजूने 164 मते पडली. तर विरोधात 99 मते पडली.