कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) आझाद मैदानावर जमल्या आहेत. मात्र या सेविकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावरून थेट बीएमसी आणि सीएसएमटी समोरच्या रस्त्यावर कुच करत काही काळ ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ या रस्त्यांवरील वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. अचानक रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनीही थेट आझाद मैदानात येत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कोरोनाचं संकट टळलं आणि त्यानंतर माझं ऑपरेशन झालं त्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत ह्यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आंदोलनासाठी इथे यावं लागलं नसतं हा माझा तुम्हाला शब्द आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाळ्यांसाठी हात वाजले तर एवढा आवाज होतो सरकारच्या कानाखाली हे हात आपटले तर किती आवाज होईल? घराघरात कोरोनाचा रुग्ण शोधणं, त्याला औषध देणं हे काम तुम्ही करत होता. डिसेंबरपासून तुम्ही मागणी करत आहात सरकारने ऐकलं का तुमचं? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.  नवरा म्हणजे काय सरकार आहे न ऐकायला. तुझं सरकार राहील का? असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. खेकडे खाऊन आरोग्य मंत्री सुदृढ झालेत, मात्र बालकं कुपोषित आहेत. महिला माता कुपोषित आहेत. गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी तुम्ही करता. ग्रामीण भागात आयुष्याचा पहिला श्रीगणेशा तुमच्या शाळेत होतो. तुम्ही पिढी घडवण्याचं काम करत आहात आणि सरकारकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.


शिवसैनिकांनी प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या लढ्यात सहभागी व्हावं असे आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. खेकडा बरा एवढे ह्यांचे तंगड्यात तंगडे झालेत. मेदींबरोबर सेल्फी पॉईंट केलेत रेल्वे स्टेशनवर. सेल्फी काढून काय मिळणार आहे. देश सेविकांनी त्यांच्या हक्काचं द्यायला पैसे नाहीत. तुम्ही निमूटपणे काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाहीय तुमच्या हक्काचं मागत आहात. आम्ही तुमच्या लढ्यात फूट पाडणार नाही, तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. माझी जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा  आम्ही आहोत. सरकार आलं तर पहिला निर्णय हा घेणार असं आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं.


या सरकारला काय म्हणतात? - 'खोके सरकार'
मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. आता 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय. का तुम्ही काही राम भक्त नाही का? राम लल्लांचं दर्शन जरूर घ्या.मी सुद्धा जाणार आहे मला आमंत्रणाची गरज नाही. पण दर्शन करून आल्यावर पुन्हा प्रश्न तोच की तुम्ही तुमच्या मुला बाळांना काय देणार आहात? याकडे कोणी लक्ष द्यायचं. 


येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे संकेत त्यांनीच त्यांनीच दिलेत. रामलल्लाच्या दर्शनासाठी कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही... जेव्हा मनात येईल तेव्हा अयोध्येला जाईन, असं उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या सभेत बोलताना सांगितलं. राममंदिर कुणा पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाही, असंही त्यांनी ठणकावलं. उद्धव ठाकरेंना अयोध्येतील राममंदिर सोहळ्याचं आमंत्रण कुरिअरनं पाठवण्यात आल्याचं समजतंय.