मुंबई : कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता नारायण राणे यांनी स्वतः चा नवा पक्ष स्थापन केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हा आता एनडीएचा भाग झाल्याने सत्तेची अनेक गणितं बदलली आहेत. भाजपामध्ये थेट प्रवेश केला नसला तरीही त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेतलं तर काय, यावर शिवसेना आज चर्चा करणार आहे.


 उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनाभवनात पक्षाचे नेते, जिल्हाप्रमुख आणि  संपर्कप्रमुखांची बैठक होतेय.  दुपारी 1 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. नारायण राणेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरुन शिवसेना नाराज आहे. राज्य सरकारची तृतीय वर्षपूर्ती आणि मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता यानिमित्तानं शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 


 शेतक-यांना घोषित झालेल्या कर्जमाफीच्या सद्य स्थितीचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाची चर्चा होणार आहे.