मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची आज मुंबईत भव्य जाहीर सभा आहे. थोड्याचवेळात या सभेला सुरुवात होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभेसाठी वर्षा या सरकारी बंगल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमाराला बाहेर पडले. तिथून पाऊणे सहाच्या सुमाराला ते मातोश्रीवर पोहोचले. मातोश्रीवरून ते बीकेसी सभास्थळी जाणार आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेबाबत शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. श्रीराम आणि हनूमानाच्या वेषातले शिवसैनिक सभेसाठी सभेसाठी रवाना होत आहेत. युवासेनाच्या नेतृत्वात हे शिवसैनिक वांद्र्याहून बीकेसीमध्ये सभेसाठी जात आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतायेत. नवी मुंबई, कल्याण, पालघर तसच राज्याच्या कानाकोप-यातून हे शिवसैनिक सकाळीच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. आजच्या सभेत उद्धव ठाकरे विरोधकांवर कोणता घणाघात करणार याचीच उत्सुकता शिवसैनिकांना आहे.


हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे असं म्हणत शिवसेनेनं कार्यकर्त्यांना साद घातलीय.  यानिमित्ताने शिवसेना जबरदस्त शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 2 महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांवरून महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. तर भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकलंय. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झालीय.