मुंबई: मला शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना धमकी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी केला. नारायण राणे यांचे 'नो होल्ड बार्ड' हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. या आत्मचरित्रात नारायण राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासाबरोबरच शिवसेना का सोडली, याची खरी कहाणी सांगितली आहे. मात्र, या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वीच त्यामधील काही मजकूर माध्यमांच्या हाती लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडतानाची कहाणी सांगताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यामुळे मला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले. राणेंना पक्षात ठेवलं तर मी रश्मी ठाकरे यांच्यासोबत घरातून निघून जाईल, अशी धमकी उद्धव यांनी बाळासाहेबांना दिली होती. शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावले होते. त्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचारही करायचा होता. मात्र, तेव्हा उद्धव यांनी बाळासाहेबांना स्पष्ट सांगितले की, राणेंना पक्षात ठेवल्यास मी आणि रश्मी घर सोडून निघून जाऊ. त्यामुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला. काही प्रामाणिक शिवसैनिकांनी ही माहिती मला दिल्याचे राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे. 


याशिवाय, नारायण राणे यांनी आत्मचरित्रात मनोहर जोशी यांच्यावरही तोंडसुख घेतले आहे. मनोहर जोशी यांच्यामुळेच शिवसेनेची वाट लागली. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्याने जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जोशी पक्षाचे भले चिंतत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच आज शिवसेनेची अशी अवस्था झाली आहे. मला डावलण्यासाठी जोशी यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुभाष देसाई यांचे नाव पुढे रेटले, असेही राणेंनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी ट्विट करून नारायण राणेंच्या आत्मचरित्राची घोषणा केली होती. अब आएगा मजा, सबका हिसाब होगा', असा मथळा लिहून नितेश यांनी ट्विट केले होते. तेव्हापासून सगळ्यांनाच राणेंच्या या आत्मचरित्राविषयी उत्सुकता लागून राहिली होती. 


शिवसेनेतील फायरब्रँण्ड नेते ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व्हाया काँग्रेस असा राजकीय प्रवास असणारे नारायण राणे नेहमीच महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रस्थानी राहिले आहेत. २००५ साली नारायण राणेंनी यांनी शिवसेना सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली होती. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर राणे राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, शिवसेना-भाजप यांची युती झाल्यानंतर राणे पुन्हा एकाकी पडले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते स्वबळावर रिंगणात उतरले आहेत.