मुंबई : Uddhav Thackeray's press conference on Governor : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा ठाकरे समाचार घेणार, असे दिसून येत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरील ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमात म्हणाले की, गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून वगळले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मग मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही. यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या विधानाने महाराष्ट्रीयन विरुद्ध बाहेरील व्यक्ती या मुद्द्याला हवा दिली गेली आहे. 


राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबाबत केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. यावरुन शिवसेनाही आक्रमक झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे आज आपल्या निवासस्थान मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होत आहे.