मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे रंगलेलं सत्तानाट्य सर्वांनीच पाहिलं. शिंदेंनी केलेल्या या बंडामुळे शिवसेनेला गळती तर लागलीच, सोबतच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. राज्यातील याच सर्व सत्तानाट्याबाबत झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. राज ठाकरे यांनी या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. राज ठाकरे यांची संपूर्ण मुलाखत आपण प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून जाणून घेऊयात. (uncut interview of mns chief raj thackeray by zee 24 taas editor nilesh khare)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रश्न - मधल्या काळात बरीच चर्चा होती तुमच्या तब्येतीबद्दल, आता कशी आहे तब्येत? 
उत्तर- बरी. 


प्रश्न - मुळात या परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा सक्रिय राजकारणात प्रचाराला जाल अशी परिस्थिती आहे? आजारपणाबद्दल बरीच चर्चा होती?
उत्तर- म्हणजे काय? आजारपण येतं आणि जातं. 


प्रश्न - शिवसेनेची शकलं झालेली बघायला मिळतात, अशा परिस्थितीमध्ये जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती आज?
उत्तर- नाही शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचारानं बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसं होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हतं.


प्रश्न - मुळात ही जी परिस्थिती तयार झाली, त्या परिस्थितीला तुम्ही कोणाला कारणीभूत ठरवाल? शिवसैनिक जबाबदार आहेत? की मग भाजपनं शिवसेना फोडली? की मग शरद पवारांनी शिवसेना फोडली?
उत्तर- त्या दिवशीच माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय नका घेऊ नका, ते हसायला लागले जोरात. जी गोष्ट घडली आहे. ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली.  याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचं तुम्ही श्रेय कसं काय काढून घेऊ शकता? कारण हे काय एकदा घडलं नाहीय त्यांच्यामुळे. जे काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि सगळ्यांनी संजय राऊतना त्याला झोडून काढलं. संजय राऊतचा काय संबंधं?



मी समजू शकतो रोज तो टेलिव्हिजनवर यायचा. त्याची ती जी काय स्टाईल, अॅरोगन्स आणि त्या सगळ्यामध्ये रोज काही ना काही बोलायचा ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. जी झाली पण नको ते. रोज रोज बोलतंय ते नको. त्याने काय आमदार फूटत नसतात. आमदार फुटण्याला कारणीभूत आणि या सगळ्याला मी बाहेर पडलो ज्या वेळेला कारणं तीच होती. आजही आमदार फुटण्याची कारणं तीच आहेत. मध्यंतरीच्या काळात जे लोक सोडून गेले त्याची कारणं तीच आहेत. पण कारणं देखील मी त्यावेळेला मी बाळासाहेबांना सांगत होतो. माहिती नाही मला त्यावेळी मी स्क्वॅश खेळत होतो.  


प्रश्न : 2006 ची ती सभा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला, त्यावेळी तुम्ही एक शब्द वापरला, बडवे... माझ्या विठ्ठलाच्या आजूबाजूला जे बडवे आहेत त्यांच्यामुळे मला विठ्ठलाला सोडावं लागतंय, सहाजिकच विठ्ठल बाळासाहेब होते. या परिस्थितीमध्ये परत बडव्यांवर आरोप होतोय, तुम्हीही बडव्यांवर आरोप केला, राणेंनी केला भुजबळांनी केला. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची काही जबाबदारी आहे किंवा नाही? म्हणजे यात उद्धव ठाकरेंची चूक वाटते किंवा वाटत नाही?
उत्तर- मी बाळासाहेबांच्या भोवतीचे बडवे म्हटलं होतं तेव्हा हे सगळेच आले त्याच्यामध्ये. उद्धव ठाकरेंच्या बाजूला काही वेगळे बडवे आहेत असं नाहीय. हेच ते सगळे...


प्रश्न : मूळ स्त्री जी असते ती कुटुंब सांभाळते आणि तिच्यामुळे कुटुंब विखुरली जातं. शिवसेनेच्या बाबतीत म्हणायचं का? कुटुंबानं शिवसेना जी आहे ती विखुरली गेली किंवा फुटली?
उत्तर- म्हणूनच ना त्यावरती लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. म्हणून मग संजय राऊतसारखा काहीतरी माध्यम निवडायचं आणि आपल्या मनातील राग त्याच्यावर काढत बसायचा किंवा अजून कोणावर तरी. मुळात कारणीभूत तेच लोक आहेत कुटुंबातलीच लोक आहेत. 


राजकारणात आणि सगळ्या व्यवहारात ज्यावेळेला त्यांचा इंटरफेअरन्स वाढला, वाढत गेला पहिल्यापासून त्याच्यातूनच या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. होत गेल्या...माझंही बाहेर पडणं त्याचमुळे होतं. तुम्ही एकांतात कधीतरी या आमदारांना किंवा शिंदेना विचारा.... काय कारण काय तुमचं तेव्हा तुम्हाला हीच कारणं मिळतील.


प्रश्न : मातोश्रीच्या राजकारणापेक्षा, चळवळीपेक्षा, विचारांपेक्षा अर्थकारणात जास्त रस होता असं तुम्हाला वाटतंय? 


उत्तर - कसं आहे या सगळ्यात चांगल्या काळात सत्तेवर यायचं अजून कोणाला तरी चोंबाळायचं आणि मग चांगल्या काळात संपत्ती गोळा करायची, आणि मग असला काहीतरी वाईट काळ आला की बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती गोळा करायची. एवढेच उद्योग चालू आहेत. तेव्हा लोकांना विचारलं जात नाही. ज्या लोकांमध्ये ज्या गोष्टी भरलेल्या आहेत त्याचं तुम्हाला काही कौतुक नाही. कसंय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असुरक्षित माणसं असतात ना, ते कधी प्रगती करू शकत नाही. ते कधी ह्याच्या खांद्यावर कधी त्याच्या खांद्यावर, असेच तो प्रवास करत असतात. मग कोणी उतरवलं की मग त्यांना त्याची जाणीव होते. जागा कळते त्यांना अजून झालीय की नाही मला माहीत नाही.


प्रश्न : तुम्ही इशारा कोणाकडे करताय ते आम्हाला नीटपणे लक्षात येतंय, तुम्ही ज्यांच्याकडे इशारा करताय त्यांना पक्षप्रमुख करण्यातही महाबळेश्वरच्या त्या अधिवेशनात तुम्हीच प्रस्ताव टाकला होता... पस्तावताय आज?
उत्तर :  बिल्कुल नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. ते बाळासाहेबांचं आपत्य आहे. त्या संपूर्ण काळामध्ये बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं. त्याच्या मनातलं काय चालू होतं हे मला जाणवत होतं. मला माहिती होतं. 


प्रश्न- बाळासाहेबांचं पुत्रप्रेम होतंच ते त्या निर्णयातून जाणवत होतंच. पण देशाचा इतिहास सांगतो पूत्र प्रेमामुळे राज्य बुडाली. सत्ता गेली याच पूत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असं म्हणायचं का?
उत्तर- अर्थातच ना, दुसरं कोण कारणीभूत आहे मला जरा सांगा. तुमची वागणूक तुमचं सगळ्या गोष्टी या पैशात मोजायच्या, पैशांत तोलायच्या. पक्षाकडे कोणाकडे बघायचं नाही लक्ष द्यायचं नाही. आज पण मला तेच म्हणायचं आहे की उद्धवकडे आता हे जे सगळं चालू आहे याने सहानभूती त्याच्याकडे जाते. मला काही कळलं नाही या गोष्टींचं. याच्यात सहानभूतीचा काय संबंध येतो. म्हणजे आता आपण पकडूया लोकमान्य टिळकांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी, ज्योतीराव फुलेंनी समजा एक बँक काढली असती आणि ते गेल्यानंतर जर समजा ती बँक डबघाईला आली असती, तर त्या बँकेत तुम्ही पैसे टाकाल का? नाही टाकणार ना. प्रश्न असा आहे की तो विचार ती गोष्ट ही बाळासाहेबांची होती ती बाळासाहेबांबरोबर गेली. आताच्या शिवसेनेमध्ये तो विचार तरी आहे का? आताचे जे कोणी प्रमुख्य अध्यक्ष जे कोणी आहेत यांच्या अंगावरती मराठीच्या विषयामध्ये हिंदूत्वाच्या विषयामध्ये अंगावर एक केस तरी आहे का मला जरा सांगा? एक मोर्चा काढला आंदोलनं केली.


तुम्ही इतकेवेळा भाषणं ऐकलीत बाळासाहेबांच्या तोंडातली काही वाक्य सोडलीत बरोबर त्यांच्यातून आलेली यांच्यापलीकडे काय हिंदूत्व मला सांगा. ज्यावेळेला रजा अकादमीनं इथे धुडगूस घातला होता त्यांच्या विरोधात काढलेला मोर्चा हा आम्ही काढला होता. पाकिस्तानी कलावंत जे इथे येऊन गाणी गातायत यांना हाकलून कोणी दिलं होतं आम्ही दिलं होतं. आताही भोंग्याचा विषय आम्ही बंद केला. यात काय आम्ही आम्ही आम्ही हा विषय नाही पण जी गोष्ट तुम्ही करता ती कन्व्हेक्शनने करता एका कमिटमेंटने करता तो विचार माझ्या आजोबांचा बाळासाहेबांचा विचार त्यांच्या विचाराचा वारसा असं वाटतं मी चालवतोय.


प्रश्न- ज्या स्वरुपाचं राजकारण तयार झालं आहे. शिवसेना विखुरलेली आहे. मुळात या विखुरलेपणातही काही लोक म्हणतायत की चला निमित्तानं राजकारणातील कुटुंबशाही संपतेय. पण या पूर्ण परिस्थितीमध्ये मातोश्रीचं किंवा बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळेल असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर- वारसा हा विचारांचा पाहिजे. संघटनेचा असता कामा नये. महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी या सगळ्यांचा विचार केला तर राहुल गांधींना पण मतदान व्हायला पाहिजे. ती काँग्रेस आहे का? नाहीय त्याच सगळ्या गोष्टींमुळे राहुल गांधींना मतदान होत नाहीय हे आपण समजून घेतलं पाहिजे. वारसा हा नेहमी विचारांचा असतो. मी दुकान टाकलंय कोणाचे तरी चालवायचे धो धो चालायचं. तुम्ही मार्मिक वाचता का? ते बोलले नाही. मला आठवतंय ज्यावेळी बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केलं. त्यावेळी 60 सालीचा खप जवळपास 1 लाख होता. त्यावेळी सगळ्या मासिक आणि साप्ताहिकांना धुवून काढलं होतं. नवीन गोष्ट होती. व्यंगचित्र साप्ताहिक होतं महाराष्ट्रात तसं काही नव्हतं. लोक वाचत नाहीत. घेत नाहीत. लोकांना माहिती नाही की मार्मिक चालू आहे. का नाही वाचत? कारण त्या मार्मिकमध्ये बाळासाहेब नाहीत. बरोबर की नाही?


बाळासाहेबांनी सामना जेव्हा सुरू केलं, त्यावेळचा खप काय होता? दोन तीन चार लाखतरी खप होता त्यावेळेला. खूप खप होता. आज तेवढा खप आहे का सामनाचा? ठरावीक लोकांच्या घरात जातोय त्यापलिकडे खप आहे का? तुम्ही चेक करून बघा तुम्हाला तुमचं कळेल ते. का नाही वाचत लोक? कारण त्या सामनात बाळासाहेब नाहीयेत....


मग जी शिवसेना सुरू केली त्यात बाळासाहेब नाहीयत त्या फक्त गोष्टीवरती एका आठवणीवरती किंवा सिंपथीवरती तुम्ही तीच तीच गोष्ट करत बसायची काय अर्थ आहे त्या गोष्टीला? बरं तो वारसा जपणारी माणसं असतील तर तो भाग वेगळा. पण इथे फक्त संपत्ती आणि सिंपथी याचाच खेळ करणारी माणसं आहेत. कारण त्या दिवशी मी जे लिहिलं ना मी जे ट्वीट केलं होतं, की स्वत:च्या नशीबाला माणूस स्वत:चं कर्तुत्व समजतो, त्याचा ऱ्हास सुरू होतो. ते नशीबानी चालू होतं त्यावेळेला. 2012 पर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत त्या गोष्टी सुरू होत्या. नंतरची निवडणूक बाळासाहेबांच्या नावावरती आली. लोकांनी बाळासाहेब नाहीत म्हणून मतदान केलं. 


पुढची निवडणूक पंतप्रधान मोदी त्यांच्या नावाने झाली. आता जो घोळ घालून ठेवलाय या लोकांनी, म्हणजे मला ही गोष्टच नाही समजत की ह्यांनी वाट्टेल तसं वागायचं, वाट्टेल त्या गोष्टी करायच्या काहीतरी येऊन सांगायचं की मला कमिटमेंट दिली होती आणि मला सांगितलं होतं अडीच वर्षे तुमचा मुख्यमंत्री मला कळलं नाही. एका चार भिंतींमध्ये तुम्ही सांगताय अमित शाहांनी मला कमिटमेंट दिली होती. त्याची जाहीर भाषणं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीर भाषण आहे. ज्यावेळेला त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे बसलेले आहेत. आणि ते सांगतायत की या निवडणुकीत विजय आपल्याला मिळणार आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार. आहे ना भाषण... आहे. अमित शाहांचं भाषण आहे, ज्यामध्ये ते सांगतायत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, आक्षेप का नाही घेतलात?


निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा साक्षातकार झाला की आपल्याला कमिटमेंट दिली होती म्हणून बरं ते सांगतात दिलेली नाहीय. का देतील? मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मला अजूनही आठवतं....1989 ची गोष्ट असेल. त्यावेळेला मातोश्रीला होतं की सिंटा हॉटेलला होती मला तेवढं आठवत नाही. पण त्यावेळेला बाळासाहेब होते आम्ही सगळे होतो, गोपीनाथराव होते, प्रमोदजी होते. मला असं वाटतं त्यावेळेला ते अध्यक्ष वाहाणे होते बहुतेक, असे सगळे बसलेले होते. मग त्यावेळेला असा एक फॉर्म्युला ठरला की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. सगळ्यांनी मान्य केलं. त्या 90 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 54 आमदार निवडून आले, 42 काहीतरी भाजपचे निवडून आले. त्या सगळ्या बोलण्यानुसार मनोहर जोशी विरोधीपक्षनेते झाले. भुजबळांचं बंड झालं त्यामुळे शिवसेनेचे आमदार कमी झाले. मग त्या कमिटमेंटप्रमाणे गोपीनाथ मुंडे विरोधीपक्षनेते झाले. 


95 ला निवडणुका झाल्या त्यानुसार शिवसेनेचे 71 की 72 आमदार निवडून आले. 61,62 का 63 काहीतरी भाजपचे आमदार निवडून आले. त्याप्रमाणे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मला आठवत नाही की भारतीय जनता पक्षाकडून असा प्रस्ताव आला की नाही नाही अडीच वर्ष आम्हाला द्या. 


मग जर समजा युतीमध्ये जर हा फॉर्म्युला ठरलेला आहे तर तुम्ही का बिघडवताय आणि तुम्ही का सांगताय की अडीच वर्ष आम्हाला मिळाली पाहिजेत. मुळात ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेलं आहे ते तोडलं तुम्ही. आणि ज्याच्या विरोधात तुम्ही प्रचार केलात म्हणजे मला आताची परिस्थिती ज्यावेळी मी बघतो ना त्यावेळेला मला असं वाटतं ना. चुकीचा कॅरम फुटतो माहितीय, साला कोणाच्या सोंगट्या कोणत्या भोकात तेच कळत नाही. कोण कुठे आहे मला आता असं वाटतं लोकांना हे समजत पण नसेल आपण मतदान कोणाला केलं होतं. 


उत्तर- राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पचत नाहीत किंवा पटत नाहीत. पण तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेना त्याचा प्रमुख व्हावं अध्यक्ष व्हावं असं कधीच नव्हतं. मी बाळासाहेबांना याबद्दल पत्रं पण लिहिली होती. मी त्याही काळात फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय?


म्हणजे तुम्ही इतरांवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त निवडणुकीला भाषणासाठी बाहेर काढणार. मी ज्यावेळेला भाषण देतो त्यावेळेला मी एखाद्या गोष्टीला कन्व्हिन्स असतो. कन्व्हेक्शनने मी ते बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर समजा ती गोष्ट झाली नाही सत्तेतनंतर मी पुढच्यावेळेला काय म्हणून जाऊन भाषण करायचं? 


म्हणजे मी दुसऱ्यांच्या जीवावरती मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. उरला विषय समजा अध्यक्षपदाचा तर तो निर्णय बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांच्या मनात काय होती मी बाळासाहेबांना महाबळेश्वरला सांगितलं. मी म्हटलं काका मला माहितीय तुझ्या मनात काय आहे. आम्ही अरे तुरे मध्ये बोलायचो....


मी म्हटलं मला तुझ्या मनात काय आहे ते माहिती आहे. उद्धवला म्हटलं तू अध्यक्ष कर, माझी फक्त विनंती एवढीच आहे जाहीर मी करीन म्हणजे हा विषय बंद होईल. राज की उद्धव, हा विषय बंद होऊन जाईल. इतर कोणी जाहीर करायची गरजच नाही. 


दह्यावर दुधावर gst लावले ना त्याऐवजी whatsapp लावले पाहिजेत GST. फालतू ज्याला स्वत:ला जे वाटेल तो ते टाकतो. अनेक स्तंभ लेखक वेगवेगळ्या पक्षाचे झालेले आहेत. ए धक्का पुढच्याकडे ए धक्का पुढच्याकडे फॉरर्वर्ड करत बसायचं. 


प्रश्न- हिंदूत्व आणि हिंदूत्ववाद हा मुळात चर्चेचा विषय आहे. मग आपण हिंदुत्ववाद स्वीकारायचा का हिंदूत्व टिकवण्यासाठी? 
उत्तर- माझ्या मते आपण हिंदू आहोत. या सगळ्या त्याच्या फोडी झाल्या आहेत. आपल्याकडे वादांची कमतरता नाही. तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या अधिवेशनात सांगितलं होतं, की मला जर तुम्ही नख लावलंत तर मी हिंदू म्हणून अंगावर येईन. माझ्या भाषेला आणि मराठीला जर तुम्ही नख लावलं तर मी मराठी म्हणून अंगावर येईन. आपण मराठी आहोत, हिंदू आहोत मला असं वाटतं ही गोष्ट टिकवणं गरजेचं आहे. आपण सांस्कृतिक वारसा टिकवणं गरजेचं आहे. आपण धर्माने मानी असलो पाहिजे. धर्मांध असता कामानये. ते तसं वागतात म्हणून आपण तसं वागावं गरज नाहीय. किंबहुना होता पण कामा नये आपण. असल्या गोष्टींचं अनुकरण करून चालणार नाही आपल्याला. जे आहोत आपल्या ज्या गोष्टी आहेत इतक्या वर्षांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या टिकवणं गरजेचं आहे. त्या पुढच्या पिढ्यांच्या हातात देणं गरजेचं आहे. 


प्रश्न- बाळासाहेबांनी काढलेली शिवसेना बाळासाहेब गेले तर विचारही गेले अशी स्थिती तयार झाली आहे. मुंबई टिकली वाढली, जगली मराठी माणूस जर जगला तर तो शिवसेनेमुळे.
उत्तर- म्हणूनच मी म्हणतो वारसा जपला पाहिजे. मराठी पाट्यांवर जे आंदोलन केलं. त्यांना वेळ दिली 10 दिवस उरलेत 8 दिवस उरले त्यावेळी दणादण मराठी पाट्या सगळीकडे सुरू झाल्या. मराठी पाट्या केल्याचं आंदोलन कोणी केलं, आम्ही केलं. तुम्ही जे मोबाईल फोनवर मराठी जे ऐकता जे मराठीमध्ये नव्हतं ज्यावेळी या लोकांचे कान पिळले तेव्हा सुरू केलं. हे आम्ही केलं. आज त्या रेल्वे आंदोलनामध्ये हजारो मुलांना नोकऱ्या लागल्या. त्याच्यामुळे विचार हा जिवंत आहे की नाही, हे पाहणं गरजेचं आहे. साधी गोष्ट आहे शिवछत्रपतींनी जो विचार दिला, तो विचार घेऊन पुढे मराठेशाहीमध्ये पेशव्यांनी यांनी थेट अटकेपार झेंडा नेला, भगवी पताका लागली ना. विचार टिकतोय की नाही ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. लोकांनी ही गोष्ट पाहाणं गरजेचं आहे. ज्यावेळी मराठेशाहीने शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेला त्यावेळी लोक कोण तुम्ही असं नाही बोलले. की मतदान झालं. त्यानंतर निकाल आले. त्यानंतर एकेदिवशी पहाटे शपथविधी झाला राज्यपालांकडे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मग ते फिसकटलं. मग शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली भेट झाली वगैरे वगैरे. मग शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अशी युती झाली. आणि मग त्याचं एक सरकार बसलं. मग त्याच्यातून काही आमदार फुटले. मग ते भाजपकडे गेले आणि आता भाजपची सत्ता आलीय. मुख्यमंत्री जे फुटून गेलेत त्यांचे काय चाललंय महाराष्ट्रात? असा महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या कधीच बघितला नाही आपण. याचं कारण लोकांच्या मतांची किंमत नाहीय राहात, आणि त्याच त्याच लोकांना भावनेच्या आहारी जाऊन सतत मतदान जे करत बसता शिवसेना बाळासाहेबांची होती म्हणून आम्ही मतदान करतो. कुठे आहेत बाळासाहेब? या भावनांना काही अर्थ आहे की नाही. ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र दिवसेंदिवस मागे नेत आहोत, याचा विचारपण साधा येत नाही आपल्या मनात. की जे आमदार आपण निवडून देतोय तो आमदार भलतीकडे जातोय तो आमदार पैसे घेऊन अजून तिसऱ्या कुणाकडे तरी जातोय. काय चाललंय? लोकांनी आपलं फुकट उन्हातान्हात उभं राहायचं आणि यांना मतदान करत बसायचं का?


प्रश्न : या पूर्ण परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे चुकले असं वाटतं का? की त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायला नको होतं?


उत्तर- मुळात तुम्ही पहिल्यांदा कमिटमेंटला चुकलात ना. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री बरोबर ही गोष्ट ठरलीय ना मग तुम्ही सांगताच कसे काय की अडीच वर्ष आम्हाला द्या.


प्रश्न : त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपची राष्ट्रीय पातळीवरची पूर्ण निती बघितली तर प्रादेशिक पक्षांना संपवणं


उत्तर- पहिली गोष्ट तुम्ही बंगालमध्ये बघितली ना, तामिळनाडूमध्ये बघितलंत ना... असं कोणी संपवायचं ठरवलं तर संपत नसतं. तुम्ही जर समजा हाराखीरी केलीत तर त्याला परमेश्वर कुणीच नाही वाचवू शकत. प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की मी मोठा व्हावं. बरोबर समोरचा संपावा आणि मला राज्य मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण समोरच्यांनी आपापला विचार करायचा असतो ना? मी याला कसा संपवेन किंवा संपवेन म्हणण्यापेक्षा मी कसा वाढेन. आपल्याकडे पूर्वी म्हणायचे ना एखाद्याने ओढलेली एखादी लाईन ही त्याची खोडण्यापेक्षा मी माझी स्वत:ची ओढीत आपल्याकडे हा विचारच नाही. आता तुम्ही जर समजा आत्मघात करायचा ठरवला तर समोरच्या पक्षानं काय करायचं. काहीच करू शकत नाही.


प्रश्न- तुमच्या सातत्याने बोलण्यामध्ये विचार महत्त्वाचा जाणवतोय, मुळात हा विचाराचा वारसा तुम्ही सातत्याने दाखवण्याचा आणि...


उत्तर- मी विचार दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. मी कन्व्हिन्स आहे. मी ते कन्व्हेक्शनने करतो. तो वारसा माझ्याकडे आहे हा बघा रे तो वारसा असं नाहीय ते. ते काय आधारकार्ड नाहीय. मी कन्व्हिन्स आहे त्या गोष्टीला. मी जे लहानपणापासून बाळासाहेबांना बघत आलो, जे लहानपणापासून मी वाचलं, पाहिलं.. एक पहिले तुम्हाला सांगतो... आव आणणं आणि खरंच तुमच्या मनामध्ये असणं या दोन्ही गोष्टी लोकांना समजतात. त्याच्यामुळे मी काय आव नाही आणत आहे त्या गोष्टीचा. 


प्रश्न - तुमच्याबद्दल सातत्याने असं बोललं जातं थेटपणे की तुम्ही हिंदुत्वाचा जो तुम्ही मधल्या काळात हनुमान चालिसा आणि हा जो प्रचार झाला, भाजपने तुमच्याकडून करवून घेतलं आणि म्हणून तुम्ही.


उत्तर- कसं असतं ना, राज ठाकरेंनी पक्ष काढला तर कोणीतरी पोरगं म्हणजे की त्यांना शरद पवारांनी त्यांना सांगितलं म्हणून पक्ष काढला. म्हणजे शरद पवारांनी सांगितलं म्हणून मी पक्ष काढला? मा. बाळासाहेब असताना स्वत:चा पक्ष त्यांच्यासमोर काढणं काय सोपी गोष्ट होती का? माझा आणि शरद पवारांचा काय संबंध होता तेव्हा? आपल्याकडे ना कुठच्याही गोष्टी ना नाही नाही बहुदा भाजपचा हात असावा, बहुदा पवारांचा हात असावा हे सगळे हात चिकटवायचे त्यांचीच माणसं चिकटवतात आणि स्वत: महत्त्व वाढवून घेतात. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने हे का नाही केलं?


प्रश्न- बाळासाहेबांनी दिलेला हाच विचार काँग्रेस NCP बरोबर गेल्यानं मोडीत निघाला?
उत्तर-  दिसतोच आहे ना तुम्हाला आता. अनेक धोरणं बघितली तर काय होती धोरणं. एका होर्डिंगवर तर कमाल झाली म्हणजे. प्रवक्त्या बोलल्या की त्यांनी जे महम्मद पैगंबराबद्दल जे ऐकलं ते गोष्ट बोलल्या होत्या तिकडे, त्याच्यावर सगळ्यांनी माफी मागायला सुरुवात केली. इथे ते हरामी बसलेय ओवैसी तो आमच्या देवदेवांबद्दल जाहीर भाषणांमधनं बोलतो त्यावेळेला बाकीचे मागतात का ओ माफी? जे देश उठले होते त्या देशांनी मागितली की माफी? नाही नाही त्याच्याकडून चूक झाली. आमच्याकडून असं होणार नाही म्हणून.तो आमच्या हिंदू देवदेवांबद्दल वाटेल ते बोलला आहे माणूस. माझं म्हणणं एवढंच आहे कोणी एखादा माणूस काहीतरी करतोय लहान पक्ष असेल येत असेल पुढे बरोबर आहे. मग ते सगळेच जण सांगतात नाही नाही यांचा हात असावा बहुदा यांच्यामागे.


प्रश्न- तुम्ही हिंदू देवदेवतांचा मुद्दा उपस्थित केला, हिंदू देवदेवतांची चिकित्सा होऊ शकते त्यांच्यावर टीका होऊ शकते मात्र इतर कोणत्याही धर्माच्या देवतेवर चिकित्सात्मक असं कोणतंही वक्तव्य झालं तर प्रक्षोभ उठतो. लाखो लोकं रस्त्यावर येतात. मुळात हिंदूंमध्ये ती प्रतिक्रिया येताना दिसत नाही. गळे चिरले जातात.


उत्तर- याचं कारण असं आहे कारण हिंदू हा फक्त हिंदू मुसलमान दंगलीमध्ये हिंदू असतो. तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तो भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही की आपण कोण आहोत? आपण काय म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करायची हिंदू म्हणून की भारतीय म्हणून....समजा जास्तीत जास्त बहिष्कार वगैरे टाकायचा प्रयत्न केला आणि खालची जर चायनिजची गाडी बंद झाली तर करायचं काय? तो असा संभ्रमात असतो. तो खरा मग नंतर गुजराती होतो, मराठी होतो तामिळनाडू होतो, पंजाबी होतो, बंगाली होतो, आणि मग एकदा तो मराठी झाला की मग तो मराठी होतो, ब्राह्मण होतो, माळी होतो, कुणबी होतो, आग्री होतो सगळा होतो. मी मध्यंतरी माझ्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं की, आपण जे जातीमध्ये अडकलेलो आहोत जात काय... मला मध्यंतरी एक चांगलं पुस्तक आलं. कायस्त असं त्या पुस्तकाचं नाव होतं. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला याच्यावरती तुमची प्रस्तावना पाहिजे. मी म्हटलं मी काय जातीबितीवर लिहित नाही कधी. म्हटले नाही तरी पण आम्हाला तुमच्याकडूनच प्रस्तावना पाहिजे. मी प्रस्तावना तुम्हाला दाखवतो ती.


मी त्या प्रस्तावनेत सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. आमच्या घरात कधी कोणी जातपात पाळलेली नाही. माहितीच नाही. माहिती नाही तेच बरं आहे. त्या पुस्तकामध्ये खाद्यसंस्कृती कुठची, आपली कुलदेवत कुठचे बाकीच्या गोष्टी कुठच्या असं सगळं लिहिलेलं होतं. मी म्हटलं की सगळ्या जातींमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठची असेल तर, ती खाद्यसंकृती असेल. मग ती कुठच्याही जातीमधली असूदे.


मला असं वाटतं प्रत्येक जातीमधल्या आजीने अशी पुस्तकं लिहिली पाहिजेत आणि या गोष्टी शिकवल्या पाहिजेत टिकवल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात दिल्या पाहिजेत. हिंदू ही संस्कृती आहे. ती संस्कृती टिकली पाहिजे. आज बघा तुम्ही जवळपास मधील सव्वाशे वर्ष जर मराठेशाहीची सोडली आपण तर खिलजी आल्यापासून ते 1947 सालापर्यंत आपण पारतंत्र्यात होतो. पण आपल्या संस्कृतीत काही फरक पडला का? महिला असतील त्यांनी कुंकू लावणं असो, मंगळसूत्र घालणं, सण साजरे करणं, साडी नेसणं, वेगवेगळ्या प्रकारचे पोषाख आपल्याकडे राज्याराज्यांमध्ये ते आपण विसरलो का? घालवले का? नाही गेले यांचं कारण ही संस्कृती आहे.


ज्यावेळेला धर्माची गोष्ट येते तेव्हा हे जास्तीत जास्त असुरक्षित असतात. कारण तो संपला की ते संपले आणि या सगळ्या गोष्टीचं नीट निरीक्षण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय चाललंय आजूबाजूला हे पाहाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे राजकीय.


सम्राट तर गेलंच होतं ते. यांनी काढून टाकलं सगळ्या होर्डिंगवरचं कारण काँग्रेस-एनसीपीबरोबर आहे म्हणून. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या समोरचं काढून टाकलं. एका होर्डिंगवरती उर्दूमधील एका होर्डिंगवर बाळासाहेबांच्या अगोदर काय लावलं जनाब? म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या फक्त सत्तेसाठी आणि पैशांसाठी आणि उद्या हातातलं गेलं की तुम्ही बाळासाहेबांच्या नावाने जप करत बसायचा. मराठी माणसाने फक्त एवढंच बघत बसायचं का?  हे ढोंगी आहेत. हे फक्त बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत आहेत आणि वापर करून जेवढं पदरात अजून घेता येईल तेवढं चालू आहे. ज्यावेळेला असल्या प्रकारचे दिवस येतात त्यावेळेला असा चेहरा करून जायचं लोकांसमोर... मला कळलं नाही. इतके दिवस आजारी होते, मंत्रालयात जात नव्हते आता शिवसेना भवनला जातात. झालं बरं झालं सगळं.मला कोणाच्या वैयक्तीक आयुष्यात शिरायचं नाही आणि कुटुंबातही जायचं नाही. कुटुंब ज्यावेळेला राजकारणात येतं, पुढे येतं, सगळ्या गोष्टींचे व्यवहार ज्यावेळेला बघायला लागतात, मग तुम्ही बोलणार नाही का या गोष्टी. मी गुढीपाडव्याच्या सभेतही बोललो होतो. त्यांनी सांगितलं की माझ्या कुटुंबावर कसले येता. अरे व्वा रे व्वा! म्हणजे सगळ्या ठिकाणी तुमचं कुटुंब शिरणार आतमध्ये. कुठचीही कारवाई झाली की तुम्ही चिडणार आणि म्हणणार की कुटुंबावर कसले येता.


प्रश्न- त्यातून ईडी लागली आणि ईडी मग थोडीशी धास्तावणारी होती. त्यातून अनेक प्रश्न तयार झाले, वादही वाढत गेले. एक दोन नाही तर अनेक जणांवर ईडी लागत गेली. मुळात ईडीच्या माध्यमातून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा स्वरुपाचा प्रचार झाला.


उत्तर- हात स्वच्छ असतील तर जा सामोरी, संपताय कशाला? तुम्हाला विचारायला बोलवतायत ना, मलाही बोलावलं , गेलो ना सांगितलं... आणीबाणीच्या काळात राजकीयदृष्ट्या सगळ्यात आत टाकलं होतं ना बरोबर ना. मग हे राजकारण आहे. कसं आहे आज ते करतायत बरोबर आहे उद्या फासे पलटतात. सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या होतात. या होतच आल्या. काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारमध्ये या गोष्टी झाल्या. आता भाजपंचं आलं, भाजपही त्याच गोष्टी करतंय.


मी मागे एकदा म्हटलं होतं एका भाषणामध्ये आपण करत असलेलं एखादं धोरण तो आपण एक पायंडा पाडतो तो पायंडा समजा. आपण चुकीचा पाडला तर पुढचे येणारे त्याच्यापेक्षा दुपटीने ती गोष्ट करायला लागतात. त्याच्यामुळे आपण पाऊल टाकताना जपून पाऊल टाकलं पाहिजे. विचार केला पाहिजे गोष्टींचा हे उद्या उलटून आपल्या अंगावर नाही ना येणार. 


प्रश्न- ईडीबाबतीत तुमच्यावर आक्षेप आणि टीका ही उघडपणे अशी होते, की ईडी लागल्यापासून तुम्ही थोडं भाजपप्रणित अशा वक्तव्यांकडे वळलात?


उत्तर- काय संबंध त्याचा? मी त्या दिवशी ठाण्याच्या सभेत बोललो ना, ज्यावेळेला टीका करायची त्या वेळेला टीका करणार. पण समजा जर तिकडे काश्मीरमध्ये 370 कलम जर रद्द झालं तर त्यांचं अभिनंदन नाही करायचं? तुम्ही काय म्हणणार मी तिकडे गेलो? म्हणजे कसं आहे ना? पवारांशी जरा दोन शब्द बोललो की अच्छा पवारांसोबत युती होते का? यांच्याबरोबर बोललो की अच्छा म्हणजे भाजपसोबत युती होते का? 


एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला बारामतीला आले तेव्हा "शरदजी की उंगली पकडके मैं राजनिती मे आया" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. बरोबर ना? म्हणजे काय लगेच पवार आणि मोदी यांची युती झाली? तुम्हाला काय आहे ना तुम्हाला जे रोज 24 तास जे चालवायचं असतं ना... सतत जे काय कोळसा टाकायला लागतो ना जो मिळेल तो टाका. दिवसभर तुमच्यासाठी बातम्या कोण बनवणार? 


मध्ये नव्हतं का आलं अमित ठाकरेंना मंत्री करणार. एक कोणीतरी रिकामटेकडा बसलेला असेल कुठेतरी आज काय काम नाही टाका बातमी. कशाचा कशाला काही संबंध नाही. आता काय आहे तुमच्याकडून काही मिळत नाही ना मग आता आम्ही बातमी टाकतो तुम्ही उत्तरं द्या हे उलटे उद्योग सुरू झाले.


प्रश्न : अशी एक चर्चा होती सध्याच्या परिस्थितीमध्ये मनसेमध्ये हे जे 40 आमदार आहेत ते विलीन करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून कायदेशीर पातळीवर हे आमदार गट म्हणून स्थापित होतील. ते पक्षात विलीन होतील. प्रस्ताव आला तर या 40 आमदारांना स्वीकाराल?


उत्तर : शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेली लोकं आहेत पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही बोलताय तशा बातम्या मीही ऐकल्या आहेत. टेक्निकल मला काही फार माहिती नाही. समजा त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन. 


प्रश्न - असं नाही वाटत की यामुळे तुमचा कार्यकर्ता जो आहे त्याला दुजाभाव दिला जाईल?
उत्तर- अजिबात नाही. माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक आहे बाकीचे नंतर. 


प्रश्न- या पूर्ण परिस्थितीमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. अभूतपूर्व असं बंड आहे. पण हे काही पहिल्यांदा झालं नाही शिवसेनेत. भुजबळांनी केलं, राणेंनी केलं मग अगदी राज ठाकरेंनीही केलं.. राज ठाकरेंच्या बंडाला


उत्तर- माझं बंड नव्हतं. मी बाळासाहेबांना सांगून निघालो होतो. दुसऱ्या कुठच्या पक्षात नाही गेलो. राजकीय सत्तेच्या स्वार्थासाठी मी दुसऱ्या कुठच्या पक्षात नाही गेलो. मी बाळासाहेबांना सांगून भेटून तो पक्ष स्थापन केलेला आहे. त्या बंडाची तुम्ही माझ्याबरोबर बरोबरी करू नका.


प्रश्न- तुम्ही ज्यावेळी बाहेर पडलात त्यावेळेला तुमच्याबरोबर एक आमदार होता आणि शिंदेजी 40 आमदार घेऊन बाहेर पडले. मुळात त्यामुळे एक तुलना व्हायला सुरुवात.


उत्तर- माझ्याबरोबर बाळा नांदगावकर जे आले ते शिवसेनेचेच आमदार होते ना! निवडणूक लागेपर्यंत कधीही बाळा नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपिठावर नव्हते ते बरोबर होते. पण शिवसेनेकडून आलेला व्हिप असायचा तो व्हिप बाळा नांदगावकर पाळायचे. परत मी तुम्हाला सांगतोय ते आणि हे वेगळं आहे. 


प्रश्न- ही तुलना होऊ शकत नाही, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची तुलना होऊच शकत नाही. राज ठाकरेंबद्दल मधल्या काळात 2006 नंतर पक्ष स्थापन झाल्यानंतरच्या अनेक टप्प्यांवर यश-अपयश, उतार चढाव राजकारणामधून जवळून बघितले. त्या अनुशंगाने टीकाही होत गेली. तुमच्याबद्दलची एक टीका सातत्याने होत राहिली. राज ठाकरे कार्यक्रम हातात घेतात, अर्धवट सोडतात युटर्न घेतात... का म्हणून असं होतं? 


उत्तर- याचं कारण माझ्या विरोधकांचा तो प्रचार आहे. मला एक गोष्ट दाखवायची की जी गोष्ट मी अर्धवट सोडली. मुळात पहिल्यांदा आंदोलनं केली आम्ही. जे माझ्यावर टीका करतायत पाकिटमार जे काय स्तंभलेखन करून माझ्यावर टीका करतायत अर्धवट सोडतात...अर्धवट सोडतात... या सगळ्यात ते राजकीय पक्ष काय करत होते? ज्याच्या जाहिरनाम्यात सांगितलंय आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून शिवसेना-भाजपच्या जाहिरनाम्यात आहे ना, मग ज्यावेळेला राज ठाकरेनं जेव्हा टोलमुक्तचं आंदोलन केलं आणि महाराष्ट्रात 65 का 67 टोलनाके बंद केले. त्याचं श्रेय देणार नाही तुम्ही? हे जे सगळे मुंबई आणि या ठिकाणी टोल सुरू आहेत ते टोल बंद करण्याचं काम त्यांचं होतं ना सत्तेत आल्यावर. त्यावर एक प्रश्न विचारणार नाही तुम्ही. ते उत्तरं देणार नाहीत. ते आंदोलनं करणार नाहीत. माझं एक तुम्ही आंदोलन दाखवा मला जे अर्धवट सोडून दिलं मी. भोंग्याचं आंदोलनच घ्या, जवळपास 92 टक्के भोंगे बंद झाले. झाले ना बंद. आजपर्यंत फक्त भोंगे काढा काढा काढा एवढंच सांगत होते. बाकीचे सगळेही कमी झाले ना. प्रश्न असा आहे यामध्ये हे करणार काही नाहीत लोक पण जो करतोय ना त्याला बदनाम कसा करायचा? त्याला यश मिळता कामा नये. त्याला यश मिळालं की मग सांगायला मोकळे आमचाच हात होता.


प्रश्न- तुम्हाला यश मिळालं. मग ते आमदारांच्या रुपानं मिळालं, नगरसेवकांच्या रुपानं मिळालं, 13 आमदार निवडून आले त्यातले 12 गेले एकच आज उरला. 7 नगरसेवक निवडून आले 6 शिवसेना घेऊन पळाली. असं का होतं तुमच्याबाबतीत?


उत्तर : असं माझ्याच बातीत नाही सगळ्यांच्या बाबतीत होतं. पवारसाहेबांनी सांगितलं होतं की त्यांचे 52 का 54 आमदार निवडून आले होते. परदेशी गेले परदेशातून आले तोपर्यंत 52 आमदार निघून गेले होते. तुम्ही बाकीच्यांचा इतिहास विसरताय किंवा टाळताय. प्रत्येक पक्ष जेव्हा मोठा होत असतो ना तेव्हा हे फटके, धक्के, चटके सगळं खायला लागतात ज्यावेळेला तुम्ही स्वत: तयार करता त्यावेळेला. हीच गोष्ट बाळासाहेबांच्याही आयुष्यामध्ये आली, पवारसाहेबांच्या आली प्रत्येकाच्या आली. इंदिराजींना राजनारायण यांनी पाडलं होतं. अटलजी, अडवाणीजी हेही त्यावेळी पडले होते 84 साली. ही स्थित्यंतरं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात आणि जातात प्रत्येक राजकीय पक्षाच्या. तुम्ही आजचा भारतीय जनता पक्ष बघताय ना पण त्याचा जन्म 52 साली झाला. त्याचं नाव 80 साली बदललं गेलं. 14 साली त्यांना संपूर्ण बहुमत त्यांच्या हातात आलं. 1952 ते 2014 हा प्रवास विसरायचा. 66 साली शिवसेनेचा जन्म झाला. पण शिवसेनेच्या हातात मुंबई महानगरपालिका 85 साली आली. त्याच शिवसेनेला राजकीय चिन्ह 89 ला मिळालं. 47 पासूनचे काँग्रेस बघतोय पण त्याच्याआधीचं काँग्रेसचा संघर्ष बघणार नाही ना आपण. प्रत्येक पक्ष हा वेगवेगळ्या राजकीय संघर्षातून जात असतो. तो त्याच्या टप्प्यावरून जात असतो. त्याच्या विचारांनीच जात असतो. मला एवढा विश्वास आहे की मी माझ्या विचारांचा पक्का आहे. जो वारसा मला माझ्या आजोबांकडून, काकांकडून, वडिलांकडून मिळाला त्या विचारांचा मी पक्का आहे. त्याला ओहोटी लागणार नाही.


प्रश्न: विचार महत्त्वाचा आहे राजकारणातला त्यातून चळवळ उभी राहाते, राजकारणात आता ना विचार राहिलाय ना चळवळ, आता पाहिलं की अर्थकारण पाहायला मिळतं. मग त्यातून आमदार फुटतात. कसं बघता याकडे?


उत्तर- माझेही आमदार त्याच्यातूनच गेले, प्रत्येकाचे त्यातूनच गेले. भुजबळ जे गेले ते सत्तेसाठीच गेले. 


प्रश्न - हे जे परिवर्तन होतंय राजकारणाचं 
उत्तर- मला असं वाटतं की लोकांनी या लोकांना शासन केलं पाहिजे. निवडणुकीच्या वेळी यांना जेव्हा मतपेटीतून धक्के बसतील तेव्हा वठणीवर येतील. तोपर्यंत वठणीवर येणार नाहीत. हे जनतेला गृहित धरतात, सत्तेत आल्यावर वाटेल तसं वागतात. पुढच्यावेळेला निवडणुकीला जेव्हा उभे राहतात कुठच्यातरी भावनेतून लोक मतदान करतात हे पुन्हा निवडून येतात. आपण केलेल्या ज्या चुका आहेत त्या त्यांना बरोबर वाटायला लागतात या गोष्टी होत असल्याने जनताजनार्दन जी आहे ती शासन करत नाही. कोणाला शासन करते ज्यांनी कामं केली. आम्ही नाशिकमध्ये कामं केली आम्हाला शासन केलं. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये कामं केलं. अजित पवारांची सत्ता गेली तिथून. जो काम करत नाही जे सतत तुमच्याशी प्रतारणा करणार त्यांना तुम्ही मतदान करणार आणि निवडून आणणार.


कुठचीही कमिटमेंट तुमच्याशी करत नाहीत. नुकतं आपलं बाहेर येणार आणि बोलणार त्याचं काय होणार? जाहिरनामे तर कधीपासून छापले जातात त्यांच पुढे काय होतं कोणी वाचत पण नाही. जोपर्यंत राजकारण हा एक खेळ आणि गंमत असं म्हणून सोडून देत नाही आणि गांभीर्याने घेणार. अहो तुमच्या घरातलं येणारं पाणी आहे ना ते नगरसेवक आणि हे ठरवतात. तुमच्या घरात येणार दूध त्याची किंमत काय असावी हे मंत्रालयात ठरलं जातं. तुमच्या घरात येणारं वीजबिल हे राजकारणी ठरवतात. तुमची सकाळ जी आहे ना अख्खा दिवस ती या राजकारणाशी निगडीत आहे. त्याचं गांभीर्य नाहीय आपल्याला तिकडे कोण बसले पाहिजेत. आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्याचं उत्तर जनतेकडे आहे. जे काम करतात त्यांना शिक्षा करू नका. त्यांना मतदान करून बघा, फरक पडेल तर तुमच्याच आयुष्यात.


प्रश्न- तुम्ही मतदाराबद्दल बोलताय... राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत आणि महाराष्ट्रात राज ठाकरेंची सभा म्हटली की मग लाखोनं जनसमुदाय एकत्र येतो प्रश्न हाच उपस्थित होतो की हा लाख मतदार मतपेटीत का परिवर्तित होत नाही.


उत्तर- 13 आमदार कशातून आले होते सूरत मधून? फेज असतात 2014 ला मोदींची लाट सुरू झाली, पुढे येईल आमची.


प्रश्न- मुळात या लाटेमध्ये जर भाजपनं तुम्हाला युतीचा प्रस्ताव दिला तर तुम्ही युती कराल?


उत्तर- आता मला या प्रश्नाचं उत्तरच देता येणार नाही. या जर तर मधल्या गोष्टी आहेत. मला आता असं वाटतं आता मी माझा पक्ष, पक्षातर्फे निवडणूक कशी लढवायची? याच्यानेच पुढे जाणार. युतीचा विचार करून पक्ष बांधायला घेतलात ना तर तो बांधलाच जाणार नाही. हे आयत्यावेळी त्या त्या वेळेला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या. त्या वेळीच त्या वेळेला बघू आपण. जर तरमध्ये जाण्यात काय अर्थ आहे.


प्रश्न : जर तर मध्ये नकोच जाऊयात भाजपशी युती होईल नाही होईल हा भविष्यातला प्रश्न, साधारण 2014 आणि 2017 च्या टप्प्यात तुम्ही उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा किंवा तुम्ही त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता?


उत्तर- तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं विश्वास ठेवण्यासारखं नाहीय काही. बाकीच्या लोकांचं मला वाईट वाटतं परंतु हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. 


प्रश्न- बाळासाहेबांनी तुम्हाला फोन केला होता दादू इस्पितळात आहे. तुम्ही धावत म्हणून....
उत्तर- तो विषय आणि आजारपणाचा विषय ठीक आहे. मला माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला जेवढं माहिती नाही तेवढ्य़ा जवळून मला माहिती आहे. 


प्रश्न- तुम्ही भावनिक आहात आणि अशा परिस्थितीमध्ये मराठी माणूस शिवसेनेचा मतदार पण ...
उत्तर- मराठी माणूस जे करता ना ते मला असं वाटतं ना ते भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना काही तामिळ, कानडी अशी लोक मतदान नाही करत. मराठी मराठी करताय ना ते शिवसेना कुठचं मतदान पहिलं डोक्यातून काढून टाका हे. महाराष्ट्रात जी लोक मतदान करतात ती मराठीच आहेत. 


प्रश्न- मातोश्री संकटात आहे, ठाकरे संकटात असताना....
उत्तर- नाही मातोश्री, ती एक वास्तू आहे कळलं का. एक संघटना आहे. वास्तूवर काही प्रॉब्लेम नाही. विषय संघटनेचा आहे. जो माणूस संघटना पाहात होता तो माणूस या संघटनेत नाहीय. ना त्याचा विचार त्या संघटनेत आहे. हळहळ करण्यात काय अर्थ आहे. 


प्रश्न- तुम्ही आजोबांना तुमच्या जवळून पाहिलं आता तुम्ही आजोबा झालाय पुढच्या पिढीकडे कसं बघताय? सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर... तुमची पुढची पिढी तयार आहे आता राजकारणात यायला?


उत्तर- आदित्य खूप लहान आहे. नक्की वाटतं की महाराष्ट्र, मराठी, मराठी भाषा, धर्म, आपला देश या गोष्टींकडे अत्यंत गांभीर्यानं पाहाणं गरजेचं आहे. आपला माणूस इथला माणूस मराठी माणूस, मराठी माणसाबद्दल समजून घेणं गरजेचं आहे. त्यांची भावना समजून घेणं गरजेचं आहे. तो विचारांचा वारसा त्या सर्वांनी जपणं गरजेचं आहे. 


प्रश्न- मूळ मुद्द अगदी मुलाखतीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक मुद्दा येतोय तो म्हणजे विचार तुटला की मग काय गत होते ते सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या विचाराला यश मिळेल, या विचारानं जी तुम्ही मनसेची स्थापना केली होती ती जर उद्या सत्तेत आली तर मुंबई महानगर पालिका आम्ही जर मतदारांनी ठरवलं की तुम्हाला सत्ता द्यायची तर तुम्ही वेगळं असं काय कराल?


उत्तर- जे तुम्ही पाहिलं नाहीत ते मुंबईत करून दाखवेन. ती गोष्ट काय काय असेल ते मला असं वाटतं माझ्या जाहिरनाम्यात येईल.