मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thckeray) यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल (RSS) वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती, अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केलं हे एका शब्दानेही सांगता येत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. माजी आमदार आणि भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार या वेळी उपस्थित होते. 


मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत आपल्या सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरीविषयी बोलणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांत राज्यातील सामान्य माणसाच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दमडीही दिली नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली.


घरात बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरकार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील वेगवेगळया समाज घटकांच्या वेदना, व्यथा कळल्याच नाहीत. आपल्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही हे ठाऊक नाही हे माहिती असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी असभ्य, शिवराळ भाषेचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, असं वक्तव्य राणे यांनी केलं.


भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करत मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेवर आल्यावर किती रोजगार दिले याचा हिशोब सांगण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागून निवडून आलेल्या शिवसेनेने आता मोदी यांच्यावर टीका करून आपला विश्वासघातकी चेहरा दाखविला आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.