मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतची भेट घेतली. यावेळी कंगनाने, माझा अपमान झाल्याचं सांगितलं. जेवढं जादा बांधकाम झालं होतं, तेवढंच तोडायला हवं होतं, कोर्टात जाऊन नुकसान भरपाई मागणार असल्याचं कंगनाने म्हटलं असल्याचं, आठवले म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई सर्व जाती-धर्माच्या सर्व लोकांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. रिपाई कंगनासोबत आहे. जाणूनबुजून त्रास देण्याचं काम सुरु आहे. बदल्याच्या भावनेतून कारवाई असल्याचं, आठवले म्हणाले. या मुद्द्याशिवाय इतर अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं आठवलेंनी सांगितलं. तसंच, कंगना आरपीआयमध्ये आल्यास १०० टक्के स्वागत करेन, तर भाजपमध्ये आल्यास ५० टक्के स्वागत करेन, असंही ते म्हणाले.


कंगनाचं कार्यालय पाडणं चुकीचं आहे. शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे. शिवसेना दाऊदला घाबरते, असा टोलाही आठवलेंनी लगावला आहे. 


कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकिस्तान-पीओकेशी केल्यानंतर विविध माध्यमातून तिच्यावर टीका होत आहे. कंगना राणौतच्या मुंबईमध्ये येण्याला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र कंगनाला पाठिंबा दिला आहे. 


'लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणौतलाही तिचं मत मांडण्याचा आणि  मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणं योग्य नाही. कंगना राणौतला आरपीआय संरक्षण देईल', असं रामदास आठवलेंनी म्हटलं होतं.


मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं म्हंटलंय.