आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत. कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करतच आहे, पण सामान्य जनता देखील आपल्या कल्पकतेतून या आजारावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. 'गरज ही शोधांची जननी आहे' असे म्हणतात आणि ते अधोरेखित करणारा असाच एक प्रकार समोर आला आहे. कल्याणातील एका कल्पक मेकॅनिकने कोरोना प्रादुर्भावाचा कमी धोका असणारी एक अनोखी रिक्षा बनवली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापासून सर्व वाहतुकीबरोबरच रिक्षा वाहतूकही बंद आहे. त्यामूळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र किती काळ हातावर हात ठेवून बसणार.. त्यापेक्षा समोर असलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याच्या उद्देशाने कल्याणातील गफूर शेखने ही अनोखी रिक्षा बनवली आहे.


कोरोनाचा धोका असल्यामुळे प्रशासनाने रिक्षा प्रवासावर बंदी घातली आहे. परंतु कल्याणमधील गफूर शेखने प्रवाशांचे हित लक्षात घेत  रिक्षेमध्ये खास असे सॅनिटायझरचे फवारे बसवले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व लक्षात घेत रिक्षाच्या दोन बाजूस सॅनिटायझरचे फवारे बसवण्यात आले आहेत. 


तर रिक्षामध्ये बसण्यापूर्वी हाताला सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे. तर पैसे घेण्यासाठी पेटीएमची सुविधा उपलब्ध करून  देण्यात आली आहे. जेणेकरून प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये  कमी संपर्क येईल आणि कोरोनाचा धोकाही टळू शकेल.  


कोरोनाबरोबर राहण्याची मानसिकता तयार करण्याचे आवाहन सरकरकडून करण्यात आले आहे. आता गफूर शेखसारखे जागरूक नागरिक आपली जबाबदारी ओळखून याप्रमाणे आपला व्यवसाय करण्यास सज्ज आहेत. आता खरी गरज आहे ती शासनाने अशा लोकांना सहकार्य करण्याची आणि त्यांच्या कल्पकतेचा लाभ इतरांनाही मिळवून देण्याची.